ओझर विमानतळावर प्रवाशांची विक्रमी नोंद; एकाच दिवसात १२२८ जणांनी केला प्रवास !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): ओझर विमानतळाहून नियमित विमान सेवा सुरू झाल्यापासून प्रथमच प्रवाशांची विक्रमी नोंद शुक्रवारी (ता.१३) दिवसभरात झाली. ६१० प्रवासी आले तर ६१८ प्रवाशांनी नाशिक विमानतळाहून उड्डाण केले. एकूण बाराशे २८ प्रवाशांनी नाशिक विमानतळावरून ये-जा केली.

नाशिकच्या ओझर विमानतळावरून विमान सेवा सुरू झाल्यानंतर शुक्रवारी (दि. १३) प्रथमच तब्बल १२२८ प्रवाशांनी विविध शहरांसाठी प्रवास केला. आतापर्यंतचा हा उच्चांक असून, त्यामुळे ओझरच्या विमानतळाच्या उपयुक्ततेला पुष्टी मिळाली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी इंदूरची विमान सेवा नव्हती अन्यथा आणखी प्रवासी संख्या वाढीचा विक्रम झाला असता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

नाशिकचे ओझर विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर त्याठिकाणी पॅसेंजर टर्मिनल बांधण्यात आले. मात्र, त्यानंतर विमान सेवा सुरूच होत नव्हती. केंद्र शासनाने उडान योजना सुरू केल्यानंतरही काही विमान कंपन्या आल्या आणि नंतर त्यांनी सेवा बंद केल्या. सध्या फक्त इंडीगो कंपनीची विमान सेवा सुरू असून, सात शहरांसाठी नाशिकहून जाण्या येण्याची सोय आहे.

गेल्या १० तारखेला बंगळुरूची विमान सेवा सुरू करण्यात आली, तेव्हा या सेवेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याने कंपनीला १८० आसन क्षमतेऐवजी २३२ आसन क्षमतेचे विमान पाठवावे लागले होते. ही सुवार्ता असतानाच आता एकाच दिवसात सर्वाधिक प्रवाशांनी लाभ घेतल्याचा उच्चांक नोंदवला गेला आहे. शुक्रवारी ६१० प्रवासी विविध शहरांतून नाशिकमध्ये आले, तर ६१८ प्रवासी नाशिक शहरातून अन्य शहरांमध्ये गेले, म्हणजेच एकाच दिवसात ओझर विमानतळावरून १२२८ प्रवाशांनी सेवेचा लाभ घेतला. शुक्रवारी (दि.१३) इंडिगोच्या दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, नागपूर, गोवा आणि अहमदाबाद या सहा शहरांसाठी प्रवाशांनी वाहतूक केली. इंदूरची सेवा शुक्रवारी बंद होती अन्यथा संख्या अधिक वाढली असती.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

नाशिकमध्ये इंडिगो कंपनीच्या सेवांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कनेक्टिंग फ्लाइट असल्याने प्रवाशांना सोयीचे ठरते. दिल्ली येथे जाण्या येण्यासाठी सध्या सकाळचीच फ्लाइट असली, तरी आता सायंकाळी दिल्ली सेवा सुरू करण्याची तयारी कंपनी करीत आहे. त्याच प्रमाणे नागपूरसह काही ठिकाणी १८० आसन क्षमतेचे विमान सुरू करण्याच्या तयारीत कंपनी आहे. काही नवीन विमान कंपन्यादेखील डिसेंबर, जानेवारीत नाशिकला सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790