नाशिक (प्रतिनिधी): शहरात दिवसाला सरासरी हजार ते बाराशे कोरोना रुग्ण आढळू लागल्याने अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १२ हजारांच्या घरात गेल्याचे बघून महापालिकेने आता समाजकल्याण कोविड सेंटरपाठोपाठ मेरी आणि ठक्कर डोम येथील कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी केली आहे. पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मंगळवारी या दोन्ही ठिकाणच्या सुविधांची पाहणी करीत ही कोविड केअर सेंटर तातडीने सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.
महापालिका क्षेत्रात ७ फेब्रुवारीपासून कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. सुरुवातीला ८० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याने चिंता नव्हती. मात्र, दिवसाला हजार ते पंधराशे रुग्ण आढळू लागल्याने ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १२ हजारांच्या घरात गेली आहे. घरामध्ये कोरोनाबाधित व्यक्तीकडून नियम पाळले जात नसल्यामुळे अन्य कुटुंबातील सदस्यांना लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी होत होती. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मागणी केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी तातडीने कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पालिका मुख्यालयात १४ सुपर स्प्रेडर; सहायक वैद्यकीय अधीक्षकही बाधित
महापालिका क्षेत्रात काेराेनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला असून काेराेना नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या महापालिकेतच १४ अधिकारी, कर्मचारी काेराेनाचे सुपर स्प्रेडर म्हणून समाेर अाले अाहेत. विशेष म्हणजे, यातील ८० टक्के लाेकांना काेणतीही लक्षणे नसून अापल्यापासून काेणाला काेरानाचा कळत नकळत प्रसार हाेऊ नये म्हणून त्यांनी चाचण्या केल्या हाेत्या. दरम्यान, काेराेनाचा पहिला रुग्ण अाढळल्यानंतर फील्डवर जाऊन नियंत्रण करणारे सहायक वैद्यकीय अधीक्षकही काेराेनाबाधित झाले अाहेत.
महापालिका क्षेत्रात काेराेनाचे अॅक्टिव्ह रुग्ण १२ हजाराच्या घरात गेले अाहेत. शहरात महिनाभरात साधारण पंधरा ते वीस हजार रुग्ण अाढळले असून सद्य:स्थितीत दिवसाला बाराशे ते पंधराशे काेराेनाबाधित अाढळू लागल्यामुळे पालिका अायुक्त कैलास जाधव यांनी सुपर स्प्रेडर शाेधण्याचा निर्णय घेतला. प्रामुख्याने, शहरातील किराणा दुकानदार, व्यापारी, खाद्यपदार्थ तसेच अन्य हातगाड्यावरील किरकाेळ विक्रेते यांच्या माेफत चाचण्या केल्या जात अाहे. याच माेहिमेचा एक भाग म्हणून पालिका मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तसेच विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काेराेनाचाचण्या केल्या जात अाहे. पालिकेचे जवळपास ४८०० इतके कर्मचारी असून टप्प्याटप्प्याने त्यांच्या चाचण्या केल्या जात अाहे. तूर्तास पालिका मुख्यालयातील १९९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्यानंतर त्यात २८ रुग्ण बाधित अाढळले अाहेत.
सद्यस्थितीत, पालिकेकडे सध्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १५० बेडची तर बिटको रुग्णालयात पाचशे बेडची व्यवस्था आहे. खबरदारीचा उपाय म्हणून समाजकल्याण येथील पाचशे बेडची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मात्र दिवसाला पंधराशे रुग्णांचा ट्रेंड असाच कायम राहिला तर ३० दिवसात २५ हजाराच्या आसपास रुग्णसंख्या जाण्याची भीती लक्षात घेत आता यापूर्वी बंद केलेले डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाचे मेरी कोविड सेंटर व ठक्कर डोम येथील कोविड सेंटर देखील सुरू करण्याचे नियोजन करण्यात अाले अाहे.