‘इग्नाईट महाराष्ट्र 2024’ कार्यशाळा संपन्न
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात उद्योगांना आवश्यक परवानग्या देण्यासाठी शासन कटीबद्ध असून या सुविधा एकाच छताखाली प्राप्त होण्यासाठी यापूर्वी एमआयडीसी येथे उद्योग भवन उभारले आहे. याच धर्तीवर जिल्हा उद्योग केंद्राच्या जागेवरही नवीन उद्योग भवन साकारण्यात येणार असल्याने आता नवीन उद्योगांना गती अधिक मिळणार असून यासोबतच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी केले आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे इग्नाईट महाराष्ट्र-2024 कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाव्यवस्थापक संदीप पाटील पुढे म्हणाले, उद्योग क्षेत्रामध्ये राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भार देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात औद्योगिक क्षेत्र अधिक व्यापक करुन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम व निर्यातवृध्दीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगांच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभागांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवित आहेत. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टिने संबंधित सर्व विभागाच्या सहकार्याने “IGNITE MAHARASHTRA-2024 कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संदीप पाटील यांनी यावेळी दिली.
ग्रामीण भागातील सहकारी औद्योगिक वसाहतींना पायाभुत सुविधांच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने पायाभूत सोयी सुविधा निर्मिती योजना सुरू केलेली आहे. आतापर्यंत सिन्नर, येवला येथील औद्योगिक वसाहतीच्या पायभूत सोयी सुविधासाठी रु. ३८१.८१ लक्ष एवढी रक्कम वाटप केलेली असून त्यात त्यांनी रस्ते दुरूस्तीची कामे केली आहेत. त्याचप्रमाणे सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीसाठी शासनाने रूपये १२०० लक्ष एवढी रक्कम नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी मंजूर केली आहे ते काम प्रगतीप्रथावर आहे.
एकसारखे उत्पादन असणाऱ्या उद्योजकांचे समुह तयार करून समूहाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तसेच नवीन तंत्रज्ञान समुहास प्राप्त करण्यासाठी औद्योगिक समुह स्थापन करण्यात आले असून बांबू क्लस्टर, सुरगाणा व विश्वकर्मा ग्रामोद्योग इंजिनिअरींग क्लस्टर, खतवड, ता. दिंडोरी हे कार्यन्वीत झालेले आहे. तसेच एफएमसीजी अॅग्रीकल्चर अॅण्ड पॅकेजिंग क्लस्टर, सिन्नर व एसजेजे अॅनालिटीकल रिसर्च लॅबोरेटरी क्लस्टर यांना अंतिम मंजूरी प्राप्त झालेली आहे. सद्यस्थितीत निविदा प्रक्रीया पूर्ण होऊन कार्यन्वीत होण्याच्या मार्गावर आहे. त्यामूळे सदरचे औद्योगिक समूह देखील लवकरच कार्यन्वीत होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील नव उद्योजकांना भरीव अशा अनुदानाच्या स्वरूपात उद्योग उभारणीमध्ये हातभार लावला जातो व बेरोजगारीचे निर्मुलन करण्यास मदत होत असल्याचेही महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी यावेळी सांगितले.
केंद्र शासन व राज्य शासनाने उद्योग वाढीसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत, तसेच उद्योग वाढीसाठी एमआयडीसी मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तसेच सर्व परवानग्या एकचा छताखाली मिळण्यासाठी मैत्री पोर्टलसारखी सुविधा उपलब्ध करून दिलेली याचा लाभ उद्योजकांनी व नवउद्योजकांनी घ्यावा असे आवाहन निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, यांनी केले.
जिल्ह्यातील औद्योगिक प्रगतीची थोडक्यात माहिती दिली. यानंतर नाशिक विभागाचे उद्योग सह संचालक श्री. सतीश शेळके यांनी सांगितले की, नाशिक जिल्हयात औद्योगिक गुंतवणूक सर्वसमावेशक असे पोषक वातावरण असून त्यात नवीन पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे नंतर औद्योगिक विकासाच्या दृष्टीने नाशिक जिल्हा अधिक सोयीस्कर असल्याने गुंतवणूकदारांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी असे आवाहन, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक सतिश शेळके यांनी केले.
आयोजित कार्यशाळेत मैत्री (MAITRI) ची ध्येय-धोरणे, कायदे याबाबत अपर जिल्हाधिकारी तथा मैत्रीचे नोडल अधिकारी मुंबई उन्मेश महाजन यांनी माहितीपर मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री युवा केंद्र प्रशिक्षण योजनेबाबत (CMYKPY) नोडल अधिकारी ऋषिकेश हुंबे यांनी सविस्तर माहिती दिली. तर कल्पकांत बेहरा यांनी Schemes of SIDBI for MSMSEs growth बाबत, एन. एम. पाटील यांनी न्यु इंडिया एशोरन्सच्या उद्योगासाठीच्या योजनांबाबत, पी. आर. चांदवडकर यांनी भारतीय डाक विभागामार्फत निर्यातीसाठीच्या योजनांबाबत, अनिकेत देवळेकर यांनी FIEO च्या योजनाबांबत, धीरजकुमार यांनी ONDC च्या योजना व सुरज जाधव यांनी जिल्ह्यातील निर्यातीच्या योजना व ODOP याबाबत उपस्थितांना सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमांच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मैत्री पोर्टलमुळे उद्योजकांचा वेळ वाचणार असून, केंद्र व राज्य शासनाच्या विवधि योजनांचा जिल्ह्यातील निर्यात वाढीस नक्कीच फायदा होणार अशा शब्दात कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी केले.
याप्रसंगी MAITRI Cell चे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी उन्मेश महाजन, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे विशेष कार्य अधिकारी ऋषिकेश हुंबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक सतिश शेळके, सीडबीचे सहाय्यक महा व्यवस्थापक कल्पकांत राज बेहरा, व्यवस्थापक सचिन पोटे, न्यू इंडिया एश्युरन्सचे प्रादेशिक अधिकारी एन. एम. पाटील, डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक प्रफ्फुल वाणी, इंडियन पोस्टचे मार्केटींग एक्झीक्युटिव्ह पी आर चांदवडकर, फिओचे मार्केटींग एक्झीक्युटीव्ह अनिकेत देवळकर व सुरज जाधव, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, बँक ऑफ महाराष्ट्राचे जिल्हा व्यवस्थापक बी बी लवटे, ओएनडीसीचे धीरजकुमार यांच्यासह सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी, नवउद्योजक, बँक अधिकारी उपस्थित होते.