नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदवी अथवा डिप्लोमाच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले. त्या नंतर अंतिम वर्षातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. आणि परीक्षा कशा पद्धतीने होणार, परीक्षेचा पॅटर्न कसा असणार, काही वेगळी पद्धत असेल तर आताच त्या पद्धतीने अभ्यास करण्यास सुरवात करता यावी अशा प्रकारचे या परीक्षांविषयी चे अनेक प्रश्न निर्माण झाले तोच या परीक्षा पारंपारिक पद्धतीने होणार, असे जाहीर करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पूर्णविराम देण्यात आला.
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा या पारंपारिक पद्धतीने होणार, हा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करून घेतला आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली तर ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध होण्यास अनेक अडथळे येतात त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये या अनुषंगाने परीक्षा हि लेखी स्वरूपातच घेतली जाणार हा निर्णय घेण्यात आला.
परंतु कोरोना सारख्या संकटाच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जावे लागणार हे जोखमीचे आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही विद्यार्थी शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात येतात परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी जमेल त्या पद्धतीने आपल्या मूळ गावी परतले आहेत. आता त्यांची विद्यालयीन प्रात्यक्षिके, जर्नल्स, अहवाल हे ते राहत असलेल्या हॉस्टेल्स, रूमवर राहिले आहे तर ते ऑनलाईन जमा कसे करणार हा प्रश्न बहुतांश विद्यार्थ्यांना पडला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी प्रवास करून शहरात येणार, पुन्हा त्यांची राहण्याची व्यवस्था कशी होणार ? परीक्षा दरम्यान सामाजिक अंतर राखणे कितपत शक्य होणार, या कालावधीमध्ये जर कोरोना सारख्या संसर्गजन्य विषाणूने विद्यार्थ्यांच्या जीवाला हानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेईल ? असा प्रश्न या विद्यार्थ्यांना व पालकांना पडला आहे. इतर विद्यार्थ्यांना मागील गुणवत्तेवर पास केले जाणार आहे तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सुद्धा याच पद्धतीचा अवलंब करून उत्तीर्ण करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
पदविका विद्यार्थी अमोल विधाते म्हणतोय की, शेवटच्या वर्षातील विद्यार्थी हे शहरातील निवासी नसल्याने त्यांची राहण्या खाण्याची सोय जी होती, ती पुन्हा होईल का ? जाण्या येण्यासाठी लागणारी व्यवस्था उपलब्ध असेल का ? परीक्षेसाठी शहरात आलेला विद्यार्थ्यास पुन्हा गावात प्रवेश मिळेल का ? सध्या सर्वच आर्थिक अडचणीत आहेत , विद्यार्थ्यास यासाठी काही आर्थिक मदत मिळेल का ? अशा प्रश्नावरही विचार व्हायला हवा.
विद्यार्थी गणेश सोनवणे म्हणतोय, अन्य विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे मागील गुणवत्तेवर पास केले जाणार आहे तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी अनेक सत्रातील परीक्षा दिलेल्या आहेत त्या आधारावर सरकारने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना पास करायला हवे. अनेक विद्यार्थी लॉकडाऊनच्या काळात आपापल्या मुळ गावी असून अनेक ठिकाणी नेटवर्क नाही, शैक्षणिक अहवाल पुर्ण करण्यासाठी लागणारी आवश्यक साधने उपलब्ध नाही अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प अहवाल, संशोधन अहवाल पूर्ण करण्यासाठी अनेक मर्यादा येत आहे. विद्यापीठाने अशा परिस्थितीत ऑनलाइन मौखिक परीक्षा घेतल्या तर या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे जर्नल पुर्ण असून ते आपल्या हॉस्टेल , रूमवर राहुन गेलेले आहेत त्यांनी काय करावं हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. बरं सगळं करूनही लेखी परीक्षेसाठी ही मुलं ग्रामीण भागातून सार्वजनिक प्रवास करून शहरात येतील या मुलांच्या आरोग्याची हमी कोण घेणार. त्यापेक्षा विद्यार्थ्यांना पास करावे आणि हा निर्णय मे महिन्यातच घ्यावा.
M.COM विद्यार्थिनी अंजली मोरे म्हणतेय, अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा जुलै महिन्यात होतील तर, ज्या पद्युत्तर विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर जॉब करायचा असा बेत होता, त्यांचे तर यापुढील बरेच महिने परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या प्रतिक्षेतच जातील, म्हणजे जुलै मध्ये लॉकडाऊन संपला तरीही या विद्यार्थ्यांना पदवी मार्कशीट शिवाय जॉब मिळणार नाही. तर या परीक्षेंचे निर्णय विद्यार्थ्यंचा भविष्याला अनुकूल असे घ्यावेत.