नाशिक (प्रतिनिधी): नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे आता या महामार्गाचा संपूर्ण ७०१ कि.मी. मार्ग सुरू झाला असून, शुक्रवारी या मार्गावरून ३८ हजार ९८७ वाहनांनी प्रवास केला, तर समृद्धी महामार्ग सुरू होतो त्या ठाण्यातील आमने येथून ४४७६ वाहनांनी प्रवास केला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांनी दिली.
नागपूर ते मुंबई हा प्रवास आठ तासांत पूर्ण करण्यासाठी सुमारे ६१ हजार कोटी रुपये खर्चुन प्रवेश नियंत्रित असा समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे. या महामार्गाची लांबी ७०१ कि.मी. असून, त्यातील नागपूर ते इगतपुरी हा ६२५ कि.मी. लांबीचा मार्ग यापूर्वीच प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला होता, तर इगतपुरी ते आमने हा ७६ कि.मी.च्या उर्वरित मार्गाचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी ६ नंतर हा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्या दिवशी इगतपुरी ते आमने असा ३०५ वाहनांनी प्रवास केला होता. मात्र शुक्रवारी हा आकडा वाढून ४४७६ वाहनांपर्यंत पोहोचला.
समृद्धीवरून २ कोटींहून अधिक वाहनांची धाव:
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ रोजी प्रवाशांच्या सेवेत आला. तेव्हापासून ३ जून २०२५ पर्यंत या महामार्गावरून २ कोटी १२ लाख वाहनांनी प्रवास केला आहे. त्यातून एमएसआरडीसीला आतापर्यंत १३३५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790