नाशिक। दि. २९ जुलै २०२५: शहरात हलक्या ते मध्यम सरींची रिपरिप सुरू असली तरी मागील दोन दिवसांपासून घाट प्रदेशात पावसाचा जोर वाढला आहे. गंगापूर धरण समूहात पाऊस वाढल्याने धरणात पूरपाण्याची आवक वेगाने होत असून, ७३.०४ टक्के इतके धरण भरले आहे. सोमवारी (दि. २८) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गंगापूरमधून ६०३ क्युसेकचा विसर्ग गोदावरीत सोडण्यात आला आहे.
नाशिक शहर व परिसरात पावसाची हजेरी ही फारशी समाधानकारक नसली तरीदेखील जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण या तालुक्यांमध्ये पर्जन्यमान वाढले आहे. पुढील तीन दिवसांत जुलैमधील पावसाची जिल्ह्यातील सरासरीची तूट भरून निघणार असल्याची चिन्हे आहेत.
यामुळे गंगापूर, कडवा, दारणा, आळंदी, वाघाड, वाकी आदी धरणांमधून विसर्ग नदीपात्रात वाढविण्यात आला आहे. यामुळे नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने सोमवारी (दि. २८) दुपारी १६ हजार ५६२ क्युसेक पाणी झेपावले आहे. गंगापूरचा विसर्ग मागील दहा ते बारा दिवसांपासून बंद होता; मात्र सकाळी अकरा वाजेपासून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.