नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पर्जन्यमान झाल्यामुळे धरणांत चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, सध्या वाढत्या उन्हामुळे आणि जलवापराच्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणांतील साठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण धरणसाठा ३६.२८ टक्क्यांवर आला आहे.
गंगापूर धरणात सध्या ५२.५९% पाणी उपलब्ध असून, गेल्या दहा दिवसांत साठ्यात ४ टक्क्यांची घट झाली आहे. मागील महिन्यात, म्हणजेच २० दिवसांपूर्वी या धरणात ६०.६३% पाणीसाठा होता. मात्र, तरीही यंदाचा साठा मागील वर्षाच्या तुलनेत अधिक असून, १५ एप्रिल २०२४ रोजी गंगापूर धरणात केवळ ४२.६६% पाणी होते. यंदा गंगापूर धरणसमुहात ५२.५९% पाणी असून, गतवर्षी याच दिवशी ३८.८८% साठा होता.
सात विहिरी अधिग्रहित:
जिल्ह्यात सध्या ८ शासकीय आणि १६ खासगी टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची आवश्यकता भागविण्यासाठी प्रशासनाने मालेगावात ५ आणि पेठ, सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी एक याप्रमाणे सात विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. या टँकरच्या माध्यमातून ३४ फेऱ्या केल्या जात आहेत.
टँकरच्या मागणीत वाढ:
जिल्ह्यात एप्रिलच्या मध्यात पाणी टंचाईची समस्या तीव्र होत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून इगतपुरी, मालेगाव, चांदवड, पेठ, सुरगाणा, सिन्नर, येवला अशा एकूण सात तालुक्यांतील २२ गावे व ३५ वाड्यांवर २४ टँकरच्या सहाय्याने ३४ फेऱ्यांना सुरुवात करण्यात आली आहे. यात ८ शासकीय टँकरद्वारे, तर १६ खासगी टँकरचा वापर करीत पाणी पुरवठा करत ग्रामीण भागाची तहान भागविण्यात येत आहे. येवला तालुक्यातील १२ गावे व ११ वाड्यांवर ९ टँकरद्वारे १२ फेऱ्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे. त्याखालोखाल मालेगाव तालुक्यातील १५ गावात ५ टँकरच्या १२ फेऱ्यांमधून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.