नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर गावात एका मद्यधुंद व्यक्तीच्या मारहाणीत फिरस्त्या साधूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रभाकर सदाशिव घुटे (वय ५२, रा. पिंपळगाव डुकरा, ता. इगतपुरी) असे मृत साधूचे नाव असून, शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर घुटे हे गेल्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर परिसरात वास्तव्यास होते. रविवारी रात्री त्यांच्यावर एका अज्ञात मद्यपीने अचानक हल्ला केला. त्या व्यक्तीने त्यांच्या छातीत जोरदार बुक्का मारल्याने घुटे खाली कोसळले. सोमवारी सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
शवविच्छेदन अहवालात छातीत झालेल्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासानंतर घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यात एक व्यक्ती प्रभाकर घुटे यांच्याशी झटापट करताना व नंतर त्यांच्या छातीत बुक्का मारताना स्पष्ट दिसत आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येईल, असा विश्वास अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा घटना टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दारूबंदी लागू करण्याची मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेने केली आहे.
800 Total Views , 1 Views Today