नाशिक: साडेचार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

नाशिक (प्रतिनिधी): राज्यातील बदलापुमध्ये चार वर्षांच्या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ येथे एका साडे चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावात घरासमोर खेळत असलेल्या साडेचार वर्षीय बालिकेला २६ वर्षीय नराधमाने चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेत लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. प्रकाश ऊर्फ टिल्लू एकनाथ आहेर (२६, रा. मऱ्हळ,) असे या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी संशयिताविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयित बालिकेच्या घरच्यांशी परिचित असून त्याने ओळखीचा गैरफायदा घेऊन हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोमवारी (दि.२०) सायंकाळी उशिरापर्यंत बालिका घराजवळच कुठेतरी खेळत असेल म्हणून तिच्या कुटुंबियांचे दुर्लक्ष झाले होते. मात्र अंधार पडल्यानंतर ती घरी न आल्याने तिचा शोध सुरू झाला. प्रकाशसोबत या बालिकेला दुपारी चारच्या सुमारास पाहिले असल्याचे काही गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे बालिकेचे नातेवाईक व ग्रामस्थांनी दोघांचाही शोध सुरू केला. संशयित तरुणाचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावत होता. रात्री आठच्या सुमारास बालिकेच्या नातेवाईकांनी ग्रामस्थांसमवेत वावी पोलिस ठाण्यात हा प्रकार सांगितला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश पवार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ निफाड उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे यांना कळवले. पोलिसांनी लागलीच अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला. पोलिस पथकांकडून रात्रभर बालिकेचा शोध सुरू होता. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गावातील निर्जन ठिकाणी संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर बालिका देखील सुखरूप आढळली.

तिला वैद्यकीय उपचार व तपासणीसाठी दोडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर संशयताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपहृत बालिकेस तिच्या आई व वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790