नाशिक (प्रतिनिधी): शहरातील पाणीपुरवठा आधीच कमी दाबाने होत असताना, काही नागरिक विजेच्या पंपाच्या साहाय्याने पाणी खेचत असल्याने संपूर्ण पाणी वितरण व्यवस्थेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांना बुधवारी (दि. २३ एप्रिल) यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात येणार असून, बेकायदेशीररित्या इलेक्ट्रिक मोटारी वापरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात येणार आहेत.
समान पाणीपुरवठ्यावर परिणाम:
सिडको, सातपूर, जेलरोड, पंचवटी या भागांमध्ये काही रहिवासी सर्रासपणे मोटारद्वारे पाणी खेचत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, इतर प्रामाणिक नागरिकांना आवश्यकतेनुसार पाणी मिळत नाही. पाणीपुरवठ्याचा ताण वाढत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह:
पाणी वितरण, बिल वितरण, तसेच पाणी सोडणे व बंद करण्याची जबाबदारी सध्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे आहे. मात्र, बेकायदा नळजोड, थकीत बिलांची वसुली आणि मोटारीद्वारे पाणी उपसणे या बाबतीत महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग निष्क्रीय असल्याची टीका केली जात आहे.
प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना आवश्यक तेवढेही पाणी मिळत नसल्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता वाढली असून, महापालिकेने अशा गैरप्रकारांना आळा घालावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
शहरात जेथे जेथे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तेथे लवकरच सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल. सहाही विभागातील अधिकाऱ्यांना बुधवारी परिपत्रक काढून इलेक्ट्रिक मोटार लावणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील, तसेच आतापर्यंत त्यांनी काही कारवाई केली का, याची माहिती घेऊ. – रवींद्र धारणकर, अधीक्षक पाणीपुरवठा विभाग, मनपा
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790