नाशिक (प्रतिनिधी): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नाशिकमधील वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेच्या गिर्यारोहकांनी त्रिंबकरांगेतील हरिहर किल्ल्यानजीक ब्रह्मा खुटा हा अस्पर्शित सुळका प्रथमतःच आरोहण करण्यात यश मिळवले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या त्र्यंबकेश्वर रांगेत हरिहर आणि त्र्यंबकगड यांमध्ये ब्रह्मा पर्वत आहे. ब्रह्माच्या पूर्व भागातील मधल्या टप्प्यावर खुटा नामक सुळका आहे. सुळक्याची विविध मार्गांची उंची ८५ ते १७० फूट असून गिर्यारोहणाच्या श्रेणीनुसार ह्या सुळक्याचे आरोहण मध्यम ते कठीण प्रकारात मोडते.
विशेष म्हणजे ह्या सुळक्याची गिर्यारोहणाच्या यादीमध्येही नोंद नाही. आजपर्यंत हा सुळका गिर्यारोहकांकडून आणि स्थानिकांकडून आरोहित झालेला नव्हता. अस्पर्शित ब्रह्मा खुटा सुळका वैनतेय संस्थेच्या गिर्यारोहकांनी दोर लावून यशस्वीरित्या सर करत त्यावर पहिले पाऊल ठेवले.ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे.
ही अव्हानात्मक सुळका चढाई मोहिम सर केल्याबद्दल महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वैनतेय संस्थेचे गौरव जाधव (प्रथम आरोहक), सागर पाडेकर, रोहित हिवाळे, तेजस देसाई यांच्यासह अपूर्व गायकवाड, निनाद देसले, अमित भामरे, विद्या आहिरे या गिर्यारोहकांनी ही मोहिम यशस्वी केली. वैनतेयचे विश्वस्त सुदर्शन कुलथे, भाऊसाहेब कानमहाले, आशिष शिंपी, मनोज बैरागी यांच्यासह नाशिक मधील पहिल्या महिला आरोहक सुषमा मिशाळ-मराठे यांचे या मोहिमेला मार्गदर्शन लाभले. पृथ्वीराज शिंदे यांनी संपूर्ण मोहिमेचे चित्रिकरण केले.