नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा रूग्णालय, नाशिक येथे कार्यरत असलेल्या तंबाखू नियंत्रण कक्ष, अन्न व औषध प्रशासन बिभाग, पोलिस विभाग, नाशिक व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सिडको व पाथर्डी येथील विविध भागात विशेषतः जेथे जेथे शाळा व महाविद्यालय आहेत, अशा ठिकाणी दोन दिवसीय धाडसत्र मोहिमेअंतर्गत पानटपरीधारक व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रेते अशा एकूण 26 जणांवर कोटपा कायद्यानुसार 23 हजार इतका दंड वसुल करण्यात आला, ही माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाच्या जिल्हा सल्लागार डॉ. शिल्पा बांगर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
या धाडसत्र मोहिम डी.सी.पी. क्राईम प्रशांत बच्छाव, ए. पी. आय. श्री. नागरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक निलेश पाटील, एफ.डी.ए. सहआयुक्तचे श्री. लोहकरे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनानुसार राबविण्यात आली.
यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे गोपाल कासार, पोलिस विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल गणेश बडगे, हेडकॉन्स्टेबल श्री संजय तागणे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबादचे अनिल गुंजे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बेंडाळे, पोना 1941 कोल्हे विशेष पथक, जिल्हा नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. शिल्पा बांगर, सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला पाटील, पोलिस कॉन्स्टेबल बाला नोंद्रे आदी सहभागी होते.