नाशिक (प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मंडप, स्टेज, कमानी उभारणीसह ३० ऑगस्टपूर्वीच प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
बऱ्याच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून ऐन वेळेवर प्रक्रिया करण्यासाठी कागदपत्रे सादर केली जात असल्यामुळे उडणारा गोंधळ टाळण्यासाठी महापालिकेने अखेरच्या सात दिवसांत कोणालाही परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच प्रत्येक विभागात एक याप्रमाणे सहा एक खिडकी योजनेद्वारे परवानगी दिली जाणार आहे.
शहरासह परिसरामध्ये विविध प्रकारचे सण-उत्सव साजरे करताना सार्वजनिक शांततेचा भंग होणार नाही तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही या दृष्टिकोनामधून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने मंडप धोरण तयार केले आहे. पालिका अधिनियमातील कलम २४ अन्वये नियमावलीनुसार प्रत्येक सण उत्सवामध्ये त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
सार्वजनिक मंडळांकडून तयारी केली जात आहे. गणेशोत्सव कालावधीमध्ये विविध प्रकारचे समाजप्रबोधनाचे देखावे लावण्यासाठी मंडळाकडून जागा घेतल्या जातात. महापालिकेच्या सातपूर, नाशिकरोड, सिडको, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी या सहा विभागीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना योजना सुरू केली जाणार आहे.