नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): श्रावण महिन्यात गंगाघाटावर असलेल्या श्री कपालेश्वर मंदिरात लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. त्यातच श्रावण सोमवार असला म्हणजे दुपटीने भाविक येतात.
त्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिस ठाण्यातर्फे दर श्रावण सोमवारी पहाटे ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत कपालेश्वर मंदिराकडे येणाऱ्या मालेगाव स्टॅन्ड, ढिकले वाचनालय, खांदवे सभागृह, शनिचौक, सरदार चौक या भागातील रस्त्यावर बॅरिकेडिंग टाकून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी रस्ते बंद करून केवळ पायी चालत जाणाऱ्या भाविकांना सोडले जाणार आहे.
श्रावण महिन्यात दरवर्षी सोमवारच्या दिवशी भाविकांची कपालेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी मोठी गर्दी होते.
दर्शनासाठी होणार गर्दी:
वाहनकोंडी होऊन काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने पोलिस प्रशासनातर्फे उपाययोजना म्हणून मंदिर परिसरात येणाऱ्या वाहनांना बंदी घातली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्यांची वाहने व्यवस्थित उभी करता यावी यासाठी जुना भाजी बाजार, म्हसोबा पटांगण, यशवंतराव महाराज समाधी मंदिराजवळ वाहनतळ व्यवस्था केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.