
नाशिक। दि. २५ जानेवारी २०२६: ‘माझा भारत – माझं मत’, ‘मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे’, असा संदेश आज सकाळी साडेसहा वाजता नाशिकच्या सायकलपटूंनी दिला. निमित्त होते, राष्ट्रीय मतदार दिवसाचे. यानिमित काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सहभाग घेतला.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 16 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्तचा राज्यस्तरीय कार्यक्रम नाशिक येथे होत आहे.यानिमित्त सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद, राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी अनिल सोनार, सहायक मुख्य निवडणूक अधिकारी किरण शार्दुल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी (नाशिक) मधुमती सरदेसाई, कक्ष अधिकारी राजेंद्र देहेरकर, सहायक सुरेश यादव, सायकल असोसिएशनचे अध्यक्ष अमित घुगे आदी उपस्थित होते. या रॅलीत नाशिकचे सायकलपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, देशात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे पुढील निवडणुकीत मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
![]()


