नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): गॅस कनेक्शनचे बिल भरण्याच्या बहाण्याने शहरातील दोघांना सायबर भामट्यांनी गडविले आहे. मोबाईल अॅप इन्स्टॉल करण्याचे सांगून व लिंकच्या माध्यमातून भामट्यांनी फसवणूक करताना बँकेतून सुमारे साडेसोळा लाखांच्या रक्कमेचा अपहार केला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
महात्मानगर येथील रहिवासी चाको टिसी थॉमस यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादित नमूद केल्यानुसार थॉमस यांच्यासह यश कसात या युवकाची देखील अशाच प्रकारे फसवणुक झाली आहे. संशयित भामट्यांनी ६ ते ९ जूनदरम्यान या युवकांशी संपर्क साधला. व थॉमस यांना गॅस कनेक्शनचे बिल भरण्यासाठी एमएनजीएलचे फेक अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यास प्रवृत्त केले.
या अॅपद्वारे भामट्यांनी थॉमस यांच्या बँक खात्यातील ८ लाख ८२ हजार २९० परस्पर लांबविले. तसेच यश कसात यांच्या बँक व क्रेडिट कार्डची माहिती मिळवत भामट्यांनी त्यांच्या खात्यातील ७ लाख ६५ हजार ४६९ रूपये इतकी रक्कम परस्पर अन्य खात्यात पाठवत आर्थिक फसवणूक केली. या गुन्ह्यात एकूण १६ लाख ४७ हजार ७५९ रुपयांची फसवणूक झाली आहे.
(सायबर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ६१/२०२४)