नाशिक (प्रतिनिधी): जन्मदात्या मद्यपी पित्याने आपल्या आठ वर्षाच्या लेकराचा राहत्या घरात गळा दाबून निघृण खून केला अन् मृतदेह गोणीत टाकून सासूच्या घरी दारात नेऊन टाकल्याची हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी जेल रोडवरील मंगलमूर्तीनगरात घडली. या प्रकरणी अपनाभूत चालिसांनी संशयित आरोपी सुमित भारत पुजारी (३८) याला अटक केली आहे.
जेल रोडच्या मंगलमूर्तीनगरमधील सोहम सोसायटीमध्ये संशयित पुजारी हा त्याच्या कुटुंबीयांसमवेत राहतो. त्याच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, मुलगी आहेत. मागील काही दिवसांपासून पुजारी दाम्पत्यामध्ये वाद सुरू होते. मद्याच्या नशेत तो किरकोळ कारणावरून घरात सातत्याने भांडण करायचा. त्यामुळे पत्नीने आठवडाभरापूर्वी मुंबई येथील नातेवाइकांचे घर गाठले होते, तसेच मोठा मुलगा, मुलगी हेही आजोबांकडे गेलेले होते.
मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मद्यपी सुमित व लहान मुलगा गणेश पुजारी हे दोघेच घरात होते. यावेळी गणेशचा पित्याने गळा आवळला अन् त्याचा मृतदेह गोणीत टाकून काही अंतरावर असलेल्या इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या सासूच्या दारात नेऊन टाकल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळतीय, उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मुलाचा खून करण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याचे उपनगर पोलिसांनी सांगितले.
गणेशचा मृतदेह सासूच्या घरी नेऊन टाकल्यानंतर सासूदेखील घरी नव्हती, तसेच गणेश घरात दिसत नाही, म्हणून आजोबा भारत पुजारी यांनीही त्याचा दुपारी शोध सुरू केला. संशयित सुमित याने मेहुणीला फोन करून बायको कोठे आहे? असे विचारत मुलगा गणेशला ठार मारले असून, त्याचा मृतदेह तुझ्या आईच्या घरी नेऊन ठेवला आहे, असे सांगितले. मात्र, मद्याच्या नशेत काही तर बडबड केली, म्हणून तिने दुर्लक्ष केले.
सुमितची मेहुणी प्रिया हिने सुरुवातीला त्याच्या फोनवरील संभाषणाकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, काही मिनिटांनंतर तिला तिची मैत्रीण सोनालीने फोन करत माहिती दिली आणि गणेशला ठार मारले असून, त्याला बिटको रुग्णालयात नेले आहे, असे सांगितले. हे ऐकून तिच्या पायाखालील जमीन सरकली अन् तिने हातातील धुणीभांडीचे काम सोडून बोधलेनगर परिसरातून रुग्णालय गाठले.
मद्यपी संशयित सुमित पुजारी याने मुलाचा गळा आवळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृतदेहाच्या गळ्याभोवती नखांचे ओरखडे असून, या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे. पुजारी यास पोलिसांनी अटक केली आहे. – डॉ. सचिन बारी, सहायक पोलिस आयुक्त