नाशिक (प्रतिनिधी): काठेगल्ली-पखालरोड परिसरात अतिक्रमित असलेला सातपीर दर्गा पाडणाऱ्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेला ‘टिप्पर’ गँगचा म्होरक्या सराईत गुन्हेगार समीर नासीर पठाण ऊर्फ छोटा पठाण (३४) रा. मदिनानगर, वडाळा याच्यासह पाचही संशयित आरोपींना मंगळवारी (दि.२२) न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मुंबई नाका पोलिसांनी संशयित आरोपींचा ताबा घेतला आहे. संशयितांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
दगडफेकीत सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याच्या सखोल चौकशीसाठी पोलिसांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. मात्र, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तौफीक पिंजारी, अशरफ शेख, बरकत अली शेख, गुरफान तांबोळी व समीर पठाण यांना न्यायालयात हजर करण्यात आले. गुरफान तांबोळी आणि समीर पठाण यांना १९ एप्रिलला अटक करण्यात आली होती आणि इतर आरोपींसह त्यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते, म्हणून या संशयित आरोपींसह, दोन्ही आरोपींना एमसीआर देण्यात आला. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी पोलिसांवर हल्ला करणे आदी प्रकारचा कट रचला. योग्य तपासासाठी पीसीआर मंजूर करणे आवश्यक असल्याची बाजू तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात मांडली.