नाशिक (प्रतिनिधी): शिंगाडा तलाव परिसरात राहणाऱ्या गतिमंद पुतण्याच्या हिश्श्याची कोट्यवधींची प्रॉपर्टी हडपण्यासाठी चुलतीसह तिच्या मुलांनी पुतण्याच्या डोक्यावर टोच्याने खुपसून खून केल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे. ही घटना शहरातील शिंगाडा तलाव भागातील सेठी कंपाउंड येथे ७ जुलै २०२४ रोजी घडली असून, गुरुपालसिंग सेठी ऊर्फ गुरुपाल राजा असे मृत गतिमंत युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची पोलिसांना प्रतिक्षा आहे. मनजित कौर चड्डा, तेजकिरणसिंग चड्डा (दोघे रा. गुरूव्दारामागे, सेठी कंपाउंड, शिंगाडा तलाव), शरणसिंग गिल (रा. हॉटेल पंजाब, व्दारका), करणसिंग गिल (रा. श्रीजी हाईटस्, साईसाया हॉटेलमागे, कमोद नगर) अशी संशयितांची नावे आहेत.
अभिजितसिंग जतिंदरसिंग गुजराल (३९, रा. इंदर व्हिला, तिडके कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे काका जसपाल सिंग चढ्ढा यांचे देहावसान झाले आहे. त्यांनी हयात असतानाच १० जुलै २०२० रोजी मृत्युपत्र तयार केले होते. त्यात स्वमालकीच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे वाटप केले. यात मुलगा तेजकिरणसिंग चढ्ढा याला ५० टक्के, मुलगी अस्मित कौर हिला २० टक्के, पुतण्या अभिजित सिंग यास २० टक्के व पुतण्या गुरूपाल राजा यास १० टक्के वाटा नावे केला.
संशयितांनी संगनमताने गुरूपाल राजा याचा एकूण मालमत्तेतील १० टक्के हिस्सा हडपण्याच्या उद्देशाने कट कारस्थान रचून त्याला उपाशीपोटी ठेवले. मारहाण करून एका घरात डांबून ठेवले. त्यातच ७ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेपूर्वी संशयितांनी गुरुपाल राजा याच्या कपाळासह डोक्यावर टोच्यासारख्या टोकदार वस्तूने खुपसून तसेच छाती, मांडीवर जखमा करून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल: गतिमंद गुरूपाल हा पलंगावरून तोल जाऊन पडल्याने त्याच्या डोक्यासह चेहऱ्याला दुखापत झाल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले. गुरूपाल हा गतिमंद असल्याचा आधार घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचेही म्हटले आहे. (मुंबई नाका पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २३८/२०२४)