नाशिक: बांगलादेशातून घुसखोरी करत पाथर्डी गावात मागील दीड वर्षांपासून एका स्थानिकाच्या मदतीने भाडेतत्त्वावर राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांसह एक पुरुष व एका स्थानिक इसमाला एटीएसने छापा टाकून अटक केली त्यानंतर पालघर जिल्ह्यातील वसई-विरारमधून एजंट संशयित अब्दुल अय्युब मुल्ला (४०) यास चौकशीसाठी पोलिसांनी सोमवारी (दि. १९) ताब्यात घेतले.
नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने रविवारी इंदिरानगर पोलिसांच्या मदतीने पाथर्डीमध्ये कारवाई करत संशयित मुस्ममत शापला खातून (२६), इतिखानम मोहंमद लाएक शेख (२७, सर्व रा. पाथर्डी, मूळ बांगलादेश) या दोन महिलांसह शागोर हुसेन मोहंमद अब्दुल मलिक माणिक (२८, मूळ रा. बांगलादेश) या तिघांना अटक केली होती. तसेच त्यांना आश्रय देणारा व इतिखानम या महिलेसोबत लग्न करून राहणारा संशयित गोरक्षनाथ विष्णू जाधव (३२, मूळ रा. वरवंडी) यालाही अटक केली आहे. या चौघांना इंदिरानगर पोलिसांकडून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत दोन्ही बांगलादेशी महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तर शागोर हुसेन मलिक व गोरक्षनाथ जाधव या दोघांना दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाल्मीक चौधरी हे करीत आहेत.
इंदिरानगर पोलिस व एटीएस युनिटकडून सुरू असलेल्या तपासात वसईचा आणखी एक संशयित इसम हाती लागला आहे. त्याचीही चौकशी केली जात आहे. तो कशाप्रकारे व अजून कोणाच्या मदतीने बांगलादेशी नागरिकांना भारतात प्रवेश करून देत होता? याचा तपास आता पोलिस करत आहेत.