
नाशिक । ३० एप्रिल २०२४: पोलिसांच्या हाताला हिसका देत पळून गेलेला संशयित आरोपी क्रिश शिंदे याला पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली आहे.
काठे गल्लीतील युवकावर कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अटक केलेला संशयित क्रिश शिंदे (रा. भद्रकाली) हा पोलिसांच्या हाताला झटका देऊन पोलिस ठाण्याच्या बाहेर उभ्या असलेल्या मित्राच्या दुचाकीवरून पळून गेला होता. मंगळवारी (दि. २९) दुपारी १ वाजता हा पोलिस ठाण्याच्या आवारात हा प्रकार घडला होता.
याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथकाने वेगवेगळी पथके तयार करून सदर आरोपी व त्यास पळुन जाण्यात मदत करणाऱ्या इसमाचा नाशिक शहरात व आजुबाजुचे ग्रामीण परीसरात कसोशीने शोध घेतला. त्यावेळी आरोपी क्रिश शिंदे यास पळून जाण्यास मदत करणारा त्याचा साथीदार किरण युवराज परदेशी, रा. कथडा, नाशिक याला व त्याने गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड मोटार सायकल ताब्यात घेवुन त्याचेकडे आरोपी क्रिश शिंदे याचेबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने क्रिश शिंदे याला रात्रीच्या सुमारास निलगीरी बाग, आडगाव शिवारात सोडल्याचे सांगितले. परंतु त्यानंतर तो कुठे गेला गेला याबाबत त्याला माहिती नसल्याचे सांगितलेले.
काही एक माहीती नसल्याने सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथकाने सदर आरोपीचा कोणताही ठावठिकाणा नसतांना मानवी कौशल्याने व तांत्रिक पध्दतीने तपास करून सदर आरोपीस २४ तासांच्या आत इगतपुरी शिवार, जि. नाशिक येथुन ताब्यात घेतले. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, विक्रम मोहीते हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक विक्रम मोहीते, भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार: सतिष साळुंके, कय्युम सैय्यद, लक्ष्मण ठेपणे, अविनाश जुद्रे, पोलीस शिपाई: धनंजय हासे, तौसिफ सैयद, जावेद शेख, गुरू गांगुर्डे, सागर निकुंभ, योगेश माळी, उत्तम खरपडे यांच्या पथकाने पार पाडली.