नाशिक (प्रतिनिधी): शहरातील मेळा, ठक्कर बाजार, महामार्ग बसस्थानकातून प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांच्या पर्स, पिशवी, बॅगमधून गर्दीचा फायदा घेत दागिने लांबविणारे बंटी-बबलीला जाळ्यात घेण्यास अखेर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून, एकूण सहा लाख रुपये किमतीची सोन्याची ८० ग्रॅम सोन्याची लगड, कार हस्तगत केली आहे.
मागील काही महिन्यांपासून बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे दागिने चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांनी प्रवाशी चिंतेत होते. मागीलवर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबईनाका पोलिस ठाणे हद्दीतील महामार्ग बसस्थानकात अशाच प्रकारचा गुन्हा घडला होता.
तसेच, त्यानंतरही सातत्याने सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीतील मेळा बसस्थानक, ठक्कर बाजार बसस्थानकात दागिने चोरीचे गुन्हे घडत होते. पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट-१चे पथक तयार करून या दागिने चोरांचा छडा लावण्याचे आदेश दिले. यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सहायक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, प्रशांत मरकड आदींचे पथक तयार केले. या गुन्ह्याचा तपास करत असताना प्रशांत मरकड यांना गोपनीय माहिती मिळाली.
पथकाने या गावात साध्या वेशात जाऊन सापळा रचला. येथील एका मंदिराजवळून संशयित मंगेश अशोक राखपसरे (२४) व त्याची पत्नी निशा मंगेश राखपसरे (२५) या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
राखपसरे दाम्पत्य शहरातील १ बसस्थानकात प्रवाशांच्या वेशात वावरून ज्या बससमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झालेली असेल त्या गर्दीत शिरकाव करत प्रवाशांच्या पर्स, बॅग, पिशव्यांमधून दागिने गायब करत होते. या चोरी केलेल्या दागिण्यांपैकी ३ लाख ४१ हजार रुपयांची कार त्यांनी खरेदी केली होती.
मुंबईनाका पोलिस ठाण्यात दाखल दोन, सरकारवाड्यातील दोन, पंचवटीमधील एक, असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यास गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. चोरी केलेले सोने या बंटी-बबलीने एका सोनाराकडे विक्री केले होते.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790