
नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा येथून बुलेट मोटारसायकलची चोरी झाल्यानंतर तब्बल ३५ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयिताचा माग काढत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तब्बल १८ बुलेट चोरीचे गुन्हा दाखल असणाऱ्या बुलेट राजाला जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे, त्याच्याकडून सहा बुलेटही हस्तगत केल्या आहेत.
इंदिरानगर पोलिस स्टेशन हद्दीत २८ मे रोजी पाथर्डी शिवार येथून रात्री बुलेट गाडी चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट २ ने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात एक इसम बुलेट चोरी करून निघून जात असल्याचे दिसल्यानंतर आरोपी कोठून आला होता, याचा धागादोरा तपासण्यासाठी परिसरातील जवळपास ३५ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयिताची ओळख पटवली.
संशयित अभय खर्डे याने मागील काही महिन्यांपासून बुलेट चोरी केल्या असून, तो बुलेट विक्री करण्यासाठी सिन्नर फाट्याकडून एकलहराकडे जाणाऱ्या रोडवर येणार असल्याची टीप मिळाली. बुलेटच्या खरेदीत पुण्यातील अनिकेत पठारे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यूट्यूबवर शोधली शक्कल:
बुलेट चोरी करण्याची शक्कल अभय खर्डेने यूट्यूबवर शोधली. पायाने जोर लावून हँडल लॉक तोडल्यानंतर एक वायर कापून बुलेट विनाचावी सुरू करण्याचे तंत्र अवगत करत बुलेट चोरी केल्याची कबुली संशयिताने दिली. एसवायबीए शिक्षण झालेला हा तरूण नोकरीच्या नावाखाली ठाणे येथील क्ज्रेश्वरीतील मित्राच्या घरी राहतो. प्रत्येक जिल्ह्यातून बुलेट चोरी करण्याचा त्याचा उद्देश होता.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790