नाशिक: दरोड्याच्या तयारीत असलेले सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात; शस्त्रांसह अटक !

नाशिक | ७ जून २०२५: शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा उपनगर पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला. त्यांच्या ताब्यातून तलवार, कोयता, मिरची पूड, स्क्रू ड्रायव्हर व नायलॉन दोरी असे दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस उपआयुक्त (परिमंडळ २) श्रीमती मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त (नाशिकरोड विभाग) डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

दि. ७ जूनच्या मध्यरात्री २.४० वाजता जेलरोड येथील ब्रह्मागिरी परिसरातील नर्मदा दर्शन बिल्डिंगच्या मागे काही संशयित इसम अंधारात दबा धरून बसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर झडप घातली असता काहीजण पळून जाऊ लागले. त्यापैकी संशयित वैभव पाटेकर, दीपक जाधव, साहिल मांगकाली व अनिकेत गिते यांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. तर संशयित आरोपी देविदास तोरवणे हा मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला.

झडतीदरम्यान आरोपींकडून एक लोखंडी तलवार, कोयता, नायलॉन दोरी, स्क्रू ड्रायव्हर आणि मिरची पूड जप्त करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही टोळी दरोड्याच्या उद्देशाने तेथे जमलेली होती. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुरज गवळी यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गु. र. नं. २३८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), ३१०(५), भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) व मुंबई पोलीस कायदा १३५, १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे व माहिती:

  1. दीपक भाउसाहेब जाधव उर्फ डेमू (वय २७) – रा. लोखंडे मळा, जेलरोड
  2. वैभव बाबाजी पाटेकर उर्फ बुग्या (वय २२) – रा. हॉली फ्लॉवर शाळेजवळ, जेलरोड
  3. साहिल राजू मांगकाली उर्फ पोश्या (वय २०) – रा. रोकडोबावाडी, नाशिक रोड
  4. अनिकेत नितीन गिते उर्फ अंड्या (वय २०) – रा. शिखरेवाडी, नाशिक रोड
⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित साहिल मांगकाली उर्फ पोश्या आणि अनिकेत गिते यांना यापूर्वी दोन वर्षांसाठी नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, सुरेश गवळी, हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई: सौरभ लोंढे, सुरज गवळी, संदेश रगतवान, पंकज कर्पे, जयंत शिंदे, गौरव गवळी, पोलीस कॉन्स्टेबल अतुल पाटील, पोलीस शिपाई अनिल शिंदे, सुनिल गायकवाड, मुकेश क्षिरसागर, सतिश मडवई, मिलींद बागुल यांच्या पथकाने केली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here