
नाशिक। दि. १० जून २०२५: बी. एस्सी. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय युवतीच्या आत्महत्या प्रकरणात फरार असलेल्या विवाहित प्रियकराला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने मेळा बस स्थानक परिसरात ही कारवाई केली. राहुल अभिमन दासनूर (२३, रा. कंकराळे, करंजगाव, ता. मालेगाव) असे या संशयिताचे नाव आहे. १३ एप्रिल रोजी १९ वर्षीय युवतीने पंचवटी परिसरात राहत्या घरी आत्महत्या केली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाने प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे यांना माहिती मिळाली. आत्महत्येस प्रावृत्त केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित राहुल दासनूर हा मेळा बस स्थानक येथे आला असल्याचे समजले. पथकाने सापळा रचला.
फोटोच्या आधारे संशयिताला पथकाने ताब्यात घेतले. नाव विचारले असता राहुल दासनुर असे नाव सांगितले. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता लग्न झालेले असतांना भूमिकाला अविवाहित असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फसवल्याची कबुली दिली. वरीष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित गुन्हा घडल्यापासून ३ महिने फरार होता. पथक त्याच्या मागावर होते. तो शहरात येताच पथकाने त्याला अटक केली.
![]()

