आज पुरस्कार वितरण सोहळा !
नाशिक (प्रतिनिधी): अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि राजेश पंडित यांना ‘नाशिक सिटीझन्स फोरम’चा ‘आऊटस्टँडींग सिटिझन ऑफ नाशिक’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांच्या हस्ते सोमवारी (दि. ८) हा पुरस्कार प्रदान सोहळा हॉटेल ट्रीट, मनोहर गार्डन, गोविंदनगर येथे सायंकाळी ६.३० वाजता होईल. या वेळी ‘वोट कर नाशिककर’ मोहिमेचा शुभारंभही होणार आहे.
दक्षिण गंगा म्हणून लौकिक असलेल्या गोदावरी नदीचे संरक्षण व संवर्धन करून तिला व तिचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याच्या ध्येयाने झपाटून विविध पातळ्यांवर हातात हात घालून कार्यरत असलेल्या चिन्मय उदगीरकर आणि राजेश पंडीत यांना ‘नाशिक सिटीझन्स फोरम’चा ‘आऊटस्टँडीग सिटीझन ऑफ नाशिक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
नाशिकच्या उन्नती आणि उत्थानासाठी विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या कामाला दाद देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते सोमवार दि. ८ एप्रिल रोजी उदगीरकर आणि पंडीत यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल. याच कार्यक्रमात ‘वोट कर नाशिककर’ या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठीच्या मोहिमेचा शुभारंभही करण्यात येणार आहे.
लोकप्रिय अभिनेता, मालिकानिर्माता चिन्मय उदगीरकर आणि व्यवसायाने इंजिनिअर असलेले राजेश पंडीत हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीच्या तसेच नाशिकमधील पर्यावरणाच्या रक्षणासाठी निष्ठेने कार्यरत आहेत. गोदावरीचे उगमस्थान असलेला ब्रह्मगिरीला निसर्गसंपन्नता पुर्नप्राप्त व्हावी म्हणून ते लोकसहभागातून नियमीतपणे उपक्रम राबवत असतात. ‘ब्रह्मगिरी की हरियाली, गोदावरी की पवित्रता’ या उपक्रमांतर्गत प्लॅस्टिकमुक्त ब्रह्मगिरीसाठी सध्या त्यांचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे आगामी कुंभमेळा हा निसर्गपूरक असावा म्हणून हरीत कुंभ या संकल्पनेवर प्रशासन, सर्व हितधारक (स्टेक होल्डर्स) आणि समाज यांच्यात सहमती घडवत, ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची चिन्मय आणि पंडीत यांची धडपड आहे. या कामांत ते दोघेही जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंग यांचे सहकार्य, सहभाग आणि मार्गदर्शन नियमीतपणे घेत असतात.
चिन्मय उदगीरकर सामाजिक बांधिलकी म्हणून नाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, पर्यावरण संतुलन याबाबत जनजागृतीचे काम करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चिन्मयच्या देखरेखीखाली ‘अविरल गोदावरी’ ही संस्था नदीमधील नैसर्गिक स्त्रोत खुले व्हावेत, गोदावरी प्लास्टिकमुक्त, स्वच्छ आणि निर्मळ व्हावी यासाठी कार्यरत आहे. गेल्या दहा वर्षांपासून चिन्मय वेगवेगळ्या पद्धतीने नाशिककरांना रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व पटवून देतो आहे. ‘माय वॉटर बँक’ उपक्रमाद्वारे ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ ही संकल्पना रुजविण्यासाठी त्याने केलेले कार्य लक्षणिय आहे.
नाशिकचा ‘स्वच्छता दूत’ म्हणूनही तो भरीव योगदान देत असतो. मिळेल त्या ठिकाणी देशी वृक्षाची लागवड व संगोपन करणाऱ्या चिन्मयने ‘माय ट्री’ अशी आगळीवेगळी संकल्पना ब्रह्मगिरीवर राबवली आहे. जनमानसाकडून गोदावरी नदीची स्वच्छता करून घेऊन त्यांच्या मनात नदीविषयी आपलेपणा निर्माण करण्याचे काम त्याने केले. अनेक शाळा-कॉलेजांमध्ये गोदावरी स्वच्छतेबाबत व्याख्याने त्याने दिली असून ‘वारी गोदावरी’ हा महत्वाकांक्षी उपक्रम कायमस्वरूपी अस्तित्त्वात यावा म्हणून त्याची धडपड सुरू आहे. ‘अविरल गोदावरी’ अंतर्गत त्याने क्रिया योगगुरू श्री एम आणि डॉ. राजेंद्रसिंग यांच्या उपस्थितीत नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर येथे कुंड पुनरूज्जीवन व ‘प्लान्ट माय ट्री’ या उपक्रमाचा प्रारंभ केला. जयपूर येथे झालेल्या ‘सी २०’ कॉनक्लेव्हमध्ये डॉ. राजेंद्रसिंह यांनी बनवलेला गोदावरीच्या पुनरूज्जीवनाचा आराखडा केंद्रिय मंत्रीमंडळासमोर चिन्मयने दमदारपणे सादर केला.
‘नमामि गोदा फाऊंडेशन’चे अध्यक्ष असलेले राजेश पंडीत समजामध्ये आणि विशेषतः नविन पिढीमध्ये नद्या आणि निसर्गातील पाच तत्त्वांविषयी संवेदनशीलता आणि समज वाढावी म्हणून विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करत असतात. गोदावरी नदीला प्रदुषणमुक्त, अतिक्रमणमुक्त करून तिचा प्रवाह निर्मळपणे खळाळता रहावा, या उद्दिष्टाने झपाटलेले राजेश पंडीत हा प्रश्न घेऊन न्यायालयीन लढाईतही उतरले आहेत. राष्ट्रीय हरित लवादाकडेही पंडीत यांनी त्र्यंबक येथील गोदावरी उगमस्थानाच्या समस्यांबाबत दाद मागितली आहे. पंडीत यांनी पर्यावरणाबाबत विविध शाळा कॉलेजांमधून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे. सुमारे १२ लाख विद्यार्थ्यांना हरीत कुंभ शपथ देणे, सहा लाख वृक्षारोपण करणे, एकाच दिवसात ४० हजार सरकारी अधिकारी आणि नागरिक यांच्या सहभागातून नाशिकमधील नद्या आणि जलाशयांच्या स्वच्छतेची मोहिम त्यांनी राबवली आहे.
गत कुंभमेळ्यामध्ये प्लास्टिकचा वापर घटविण्यासाठी त्यांनी ९ लाख कापडी पिशव्यांचे वाटप केले होते. हरीत कुंभ संकल्पना भारतातल्या चारही कुंभमेळा तिर्थक्षेत्रांपर्यंत पोहोचावी म्हणून डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने त्र्यंबक-नाशिकपासून ते उज्जैनपर्यंत काढण्यात आलेल्या हरीत कुंभ रथ यात्रेच्या अंमलबजावणीत पंडीत यांनी मुख्य भूमिका पार पाडली होती. ब्रह्मगिरी ते राजमुंद्री दरम्यान अवीरल निर्मल गोदावरी अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या गोदावरी साक्षरता यात्रेचे आयोजनही पंडीत यांनी केलेले आहे. भूजल पुनर्भरण (वॉटर रिचार्ज) करण्यासाठीचा माय वॉटर बँक या उपक्रमातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. नाशिकमधील नासर्डीचे सध्याचे नाला हे स्वरुप बदलून तिला नंदीनी नदी म्हणून पुनर्वैभव मिळवून देण्यासाठीही ते काम करत असतात. गोदावरी खोरे असलेल्या सहा राज्यांतील समविचारी गोदाप्रेमींना एकत्र करून नदी संवर्धनाची लोकचळवळ उभारण्याचे पंडीत यांचे प्रयत्न आहेत.