नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुविधेसाठी सिटीलिंकतर्फे जादा बसगाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. या मार्गावर तीस नियमित बसगाड्यांसह अतिरिक्त पन्नास अशा एकूण ८० बसगाड्या उपलब्ध असतील. यापूर्वीच महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्या उपलब्ध केल्या असून, त्याजोडीला सिटीलिंकच्या बसदेखील भाविकांसाठी उपलब्ध असतील.
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला भाविक दाखल होत असतात. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थातच सिटीलिंकतर्फे जादा बसेसचे नियोजन केले आहे. रविवार (ता.१८) व सोमवारी (ता.१९) असे सलग दोन दिवस जादा बसगाड्या सोडल्या जातील.
सद्य:स्थितीत नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर मार्गे निमाणी मार्गावर एकूण ३० बसेस सोडल्या जातात. त्यानुसार या ३० बसगाड्यांतून नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर दरम्यान शंभर फेऱ्या तर त्र्यंबकेश्वर ते नाशिकरोड शंभर अशा एकूण २०० फेऱ्या नियमित चालविण्यात येतात. या नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त गर्दीच्या दोन दिवशी ५० जादा बस सोडल्या जाणार आहेत.
असे आहे नियोजन: निमाणी ते त्र्यंबकेश्वर दरम्यान ३० बसेस तर नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर एकूण २० बसेस जादा सोडल्या जातील. त्यामुळे रविवारी (ता.१८) नियमित ३० तसेच जादा ५० अशा एकूण ८० बस नाशिक ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर धावणार आहेत. सोमवारी (ता. १९) एकूण २९ जादा बस सोडल्या जातील. यामध्ये निमाणी ते त्र्यंबकेश्वर १७ तर नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर १२ बसचा समावेश असेल. यातून या दिवशी नियमित ३० व जादा २९ अशा एकूण ५९ बसगाड्या या मार्गावर धावतील.