नाशिक। दि. २८ सप्टेंबर २०२५: शहर व परिसरात शनिवारी सायंकाळनंतर जोरदार पावसाच्या हजेरीने सर्वत्र पाणीचपाणी झाले होते. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ४२.२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदीला पूर आला होता. हवामान खात्याकडून रविवारी (दि. २८) नाशिक शहरासाठी ऑरेंज, तर ग्रामीण भागातील घाट प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम होता. खालचे टेंभे, ता. बागलाण येथे वादळी पावसाने घराची भिंत पडून कस्तुराबाई भिका अहिरे (७८) यांचा मृत्यू झाला. मालेगाव तालुक्यातील मळगाव शिवारात वीज पडल्याने १६ वर्षीय समाधान वाकळे हा मेंढपाळ जखमी झाला. सप्तशृंग गडासह येवला तालुक्यात मुसळधार पावसामुळे मका, सोयाबीन, कांदा पुन्हा पाण्याखाली गेला आहे. मनमाड, निफाड, त्र्यंबकेश्वर येथेदेखील दमदार पावसाने हजेरी लावली.
सहा जिल्ह्यांत रेड अलर्ट:
रविवारी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात रविवारी रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
१२१६७ क्युसेक्सने विसर्ग:
आज (रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५) रोजी दारणा धरणातून सुरु असलेला ९०१६ क्युसेक्स विसर्ग हा सकाळी ६ वाजता ३१५१ क्युसेक्सने वाढवून १२१६७ क्युसेक्स इतका सोडण्यात आला आहे.
![]()

