नाशिक (प्रतिनिधी): लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यातील कोविड-१९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणणे व नागरिकांच्या दैनंदिन जगण्यावर त्याचा कुठलाही परिणाम होवू नये अशा दुहेरी आव्हानांचा सामना करतांना जिल्ह्यात इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून अत्यावश्यक उद्योग व व्यवसायांना चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून आजपर्यंत 446 कंपन्यांना सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पाच हजार औद्योगिक आस्थापना सुरू असून ६० हजार कर्मचारी व मजूर सध्या त्यात काम करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून औद्योगिक कंपन्या व व्यावसायीक आस्थापनांना अटी शर्तींच्या आधिन राहुन त्या सुरू करण्यास चालना देण्यात येत असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक उद्योगधंदे सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईन प्राप्त अर्जांवर औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयामार्फत ४४६ कंपन्या सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यात फार्मा निर्मिती क्षेत्रातील ७५ जीवनावश्यक वस्तुंच्या निर्मिती करणाऱ्या १४१, आयटी क्षेत्रातील १९, पॅकेजींग मटेरीयल्स, अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या २११ कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या सुरु करताना लोकांच्या अत्यावश्यक तसेच गरजा लक्षात घेवून खरोखरच ज्या कंपन्या सुरू करणे आवश्यक आहेत अशाच कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे, अत्यावश्यक नसलेल्या २३० कंपन्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच लहान मोठ्या व्यावसायीक व औद्योगिक आस्थापनांच्या माध्यमातून नागरिकांचे जनजीवन सुरळीत चालेल व सोशल डिस्टन्सीचे तंतोतंत पालन करताना कर्मचारी, मजूर यांच्या रोजगाराचा विचार करून जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यामातून ऑनलाईन प्रणालीद्वारे ७ हजार ५५० आस्थापनांना परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी ६ हजार ६०० आस्थापनांची माहिती संकलीत करण्यात आली आहे, व त्यातील पाच हजार औद्योगिक आस्थापना सुरू झाल्या असून त्यात ६० हजार कर्मचारी व मजुर कामावर उपस्थित असल्याचीही माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली आहे.