लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात द्वितीय- पालकमंत्री दादा भुसे

नाशिक (जिल्हा माहिती कार्यालय): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य शासन महिलांना आर्थिक पाठबळ देत आहेत. जिल्ह्यात योजनेचे साधारण सात लाख 20 हजार 844 अर्ज मंजूर झाले असून, या योजनेच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुणे येथील राज्यस्तरीय शुभारंभाबरोबरच जिल्हास्तरावरही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन भवन सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, महिला व बालविकास विभागाचे उपआयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हाभरातून आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुणे येथील राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचे प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बालेवाडी, पुणे येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य शासन राज्यातील महिलांना सक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, महिला व बालविकास विभाग यांनी अहोरात्र मेहनत घेतली आहे. त्यांचे यावेळी पालकमंत्री भुसे यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांचे यावेळी अभिनंदन केले.

ज्या महिला भगिनी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 नंतर अर्ज करतील, त्यांना देखील या योजनेचा सुरूवातीपासून लाभ मिळणार असल्याचे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्यापपर्यंत या योजनेसाठी अर्ज केला नसेल त्यांनी देखील योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन भुसे यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यातील सद्यस्थिती दर्शक माहिती सादरीकरणातून माहिती दिली. 

प्रारंभी पालकमंत्री व उपस्थित प्रातिनिधीक महिलांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. यावेळी काही महिलांनी श्री. भुसे यांना राखी बांधली. शेवटी सर्व तालुक्यातील महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते तुळशीचे रोप देवून सन्मानित करण्यात आले. तसेच लाडकी बहीण योजनेच्या सर्व तालुकास्तरीय समित्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790