नवी दिल्ली : येणारा प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या किंमतीत वाढ घेऊन येतो. डाळींच्या किंमती आधीच गगनाला भिडल्या होत्या तर आता स्वयंपाकघरात वापरले जाणारे खाद्यतेलाही महागाईच्या ट्रेंडवर स्वार झाले आहे. मागील एका महिन्याभरात खाद्यतेलाची किंमत सुमारे १५ टक्क्यांनी महागली असून सध्या सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचा पुरवठा पूर्वीसारखा होत नाही तर देशांतर्गत बाजारातही मोहरीचे दर वाढले आहेत, परिणामी मोहरीचे तेलही महागले आहे.
वाढत्या महागाईच्या काळात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ नोंदवली गेली असताना यामुळे आता जनतेच्या खिशाला कात्री लागणार असल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा तिसरा कार्यकाळ सुरू होताच महागाईचा भडकाही उडाला आहे. आधी डाळी महागल्या तर आता खाद्यतेलाची किंमतही महागली आहे. अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून होणाऱ्या सोयाबीन तेलाचा पुरवठा कमी झाल्यामुळे तसेच देशांतर्गत मोहरीचे तेल महागणे भाववाढ मागचे कारण सांगितले जात आहे. देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी सुमारे ३० लाख टन सोयाबीन तेल आणि २५ ते ३० लाख टन सूर्यफुलाची आयात केली जाते.
खाद्यतेलाच्या किंमती महागण्याचे कारण काय?:
आमच्या सहकारी ईटीशी बोलताना अदानी विल्मर, इमामी ॲग्रोटेक आणि सनविन ग्रुप सारख्या कंपन्यांनी सांगितले की, अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयाबीन तेलाचा पुरवठा खंडित झाल्यामुळे किंमती वाढत आहेत. याशिवाय नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) आणि हरियाणा स्टेट कोऑपरेटिव्ह सप्लाय अँड मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (HAFED) यांनी मोठ्या प्रमाणात मोहरीची खरेदी केली त्यामुळे, मोहरीच्या दरात वाढ झाली.
काही काळापूर्वी मोहरी MSP च्या खाली होती मात्र या खरेदीमुळे मोहरीचा भाव एमएसपीच्या वर पोहोचला असून सध्या मोहरीचा एमएसपी दर ५,६५० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. त्याचवेळी, मोहरी महागल्याने तेलाच्या दरातही सुमारे १५% वाढ झाली आहे.
ब्राझीलमधील पुराचा सोयाबीन पिकाला फटका:
ब्राझीलमध्ये आलेल्या अलीकडील पुरामुळे सोयाबीन तेलाच्या उत्पादनावर आणखी परिणाम दिसून आला. आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीक एजन्सी इमेटरने ५ जून रोजी सांगितले की, ब्राझीलच्या दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल राज्यात अलीकडील पुरामुळे सोयाबीनचे २.७१ दशलक्ष टन नुकसान झाले. याशिवाय चीनच्या खरेदीचाही देशांतर्गत किमतींना मोठा फटका बसला. मुंबईतील आघाडीची तेल ट्रेडिंग कंपनी सनविन ग्रुपचे सीईओ संदीप बाजोरिया म्हणाले, ‘चीनने अलीकडेच सोयाबीन तेलाची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतींवरही परिणाम झाला.’