नाशिक (प्रतिनिधी): अपोलो हॉस्पिटल्स नाशिक मध्ये अवघ्या ९ वर्षाच्या यशराजचे किडनी प्रत्यारोपण करण्यात डॉक्टरांना “यश” आले आहे, लहान मुलाचे किडनी प्रत्यारोपण नाशिक मध्ये पहिल्यांदाच झाले असून शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती व्यवस्थित आहे. यावेळी त्याच्या ५७ वर्षाच्या आजीने किडनी दान करून समाजापुढे अनोखा आदर्श ठेवला आहे.
यावेळी बोलतांना अपोलो हॉस्पिटल नाशिक चे किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ञ डॉ. मोहन पटेल म्हणाले की “अवघ्या ९ वर्षाच्या यश च्या मागील एक वर्षांपासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या त्यामुळे त्याचे डायलिसिस सुरु होते पण त्याच्या रक्तवाहिन्या लहान असल्याने फिशुला करणे शक्य नव्हते त्यामुळे कॅथेटर मधून डायलेसिस सुरु होते इतक्या कमी वयाच्या रुग्णाचे डायलिसिस सतत चालू ठेवणे हे रुग्णाला त्रासदायक, अडचणीचे आणि धोक्याचे असल्याने किडनी प्रत्यारोपण करणे अत्यंत आवश्यक होते. अशावेळी मेंदूमृत व्यक्तीची किडनी मिळण्याकरीता लागणारा कालावधी अधिक असल्याने त्याला नातेवाईकांपैकी कोणीतरी किडनी दान करावे असे सांगण्यात आले, त्यानंतर यश च्या आई आणि वडिलांनी किडनी दान करण्याची तयारी दर्शविली पण त्यांच्या तपासणी नंतर दोघेही किडनी दान करण्यासाठी तंदुरुस्त नव्हते असे लक्षात आले, या वेळी क्षणाचाही विलंब न करता आपल्या नातवाला सर्वसामान्य जीवन जगता यावे यासाठी यश च्या आजी ने किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आणि यश ला पुन्हा नवीन जन्म प्राप्त करून दिला”.
प्रसिद्ध युरोसर्जन डॉ. किशोर वाणी यांनी सांगितले कि, “लहान मुलांवर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होत नाही हा समाजात गैरसमज आहे, मोठया व्यक्तींच्या तुलनेने लहान मुलांमध्ये किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे जास्त गुंतागुंतीची असते पण किडनी प्रत्यारोपण करणाऱ्या सर्जनचा अनुभव, अपोलो हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असलेले अद्ययावत तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची घेण्यात येणारी काळजी यामुळे हे प्रत्यारोपण यशस्वी झाले. अवघ्या ९ वर्षाच्या यश चे डायलेसिस मुळे सगळं जीवन बदलून गेले होतं, किडनी प्रत्यारोपण केल्याने त्याची शारीरिक वाढ इतर लहान मुलांसारखीच व्यवस्थित होईल आणि त्याला पुढील जीवन सर्वसामान्य पणे जगता येईल.
युरोसर्जन डॉ. प्रवीण गोवर्धने म्हणाले की , “लहान मुलांमध्ये रक्तवाहिन्यांचा आणि मूत्राशयाचा आकार वयानुरूप लहान असतो , प्रौढ व्यक्तीच्या किडनीचे लहान मुलांमध्ये प्रत्यारोपण करतांना रक्तवाहिन्यांचे दिले जाणारे जोड किंवा मूत्रनलिकेचा मुत्राशयाला दिला जाणारा जोड हि अतिशय क्लिष्ट प्रक्रिया आहे , लहान मुलांमध्ये लघवीचा मार्ग देखील छोटा असतो आणि लहान मुलाला प्रत्यारोपणाद्वारे बसविण्यात येणारी किडनी आकाराने मोठी असल्याने तिला जास्त जागा लागते त्यामुळे प्रत्यारोपण करताना खूप जास्त काळजी घ्यावी लागते”
अपोलो हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रसाद मुगळीकर म्हणाले “अपोलो मध्ये असलेल्या अनुभवी, निष्णात डॉक्टरांची टीम आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि कुशल कर्मचारी यांच्या उपलब्धते मुळे आणि मेहनतीमुळे किडनी प्रत्यारोपण सारख्या मोठया आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी पणे पार पडतात तसेच प्रत्यारोपणानंतर रुग्णाची स्वछता आणि जेवणाची खूप काळजी घ्यावी लागते, रुग्णाला कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणार नाही याची हि काळजी घेतली जाते . अपोलो हॉस्पिटल नाशिक मध्ये अवघ्या ४ वर्षात ६० रुग्णांवर यशस्वी पणे किडनी प्रत्यारोपण झाले आहे , किडनी प्रत्यारोपण करण्याकरिता बऱ्याच रुग्णांची आर्थिक परिस्थिती दुर्बल असते अशा रुग्णांना काही स्वयंसेवी संस्था तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत आर्थिक देणगी मिळावी यासाठी अपोलो हॉस्पिटल तर्फे प्रयत्न केले जातात , किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी आधी मुंबई किंवा पुण्याला जावे लागत पण हि सुविधा नाशिक मधेच असल्याने आता कुठेही जाण्याची गरज नाही रुग्णाला सगळ्या सुविधा नाशिक मधेच उपलब्ध झाल्याने त्याची आर्थिक बचत होते .अपोलो हॉस्पिटल्स नाशिकमध्ये आम्ही नेहमीच दर्जेदार उपचार आणि काळजी प्रदान करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करत असतो.
यावेळी अपोलो हॉस्पिटल चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रसाद मुगळीकर , किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ञ डॉ.मोहन पटेल,युरोसर्जन डॉ.किशोर वाणी, डॉ प्रवीण गोवर्धने , जनरल सर्जन डॉ.मिलिंद शाह , हृदय शस्त्रक्रिया तज्ञ् डॉ.अभयसिंग वालिया, किडनी विकार तज्ञ डॉ.प्रकाश उगले, भूल तज्ञ डॉ. चेतन भंडारे , अवयव प्रत्यारोपण समन्वयक सौ.चारुशीला जाधव , विपणन प्रमुख डॉ.मंगेश जाधव, कैवल्य सोहनी आदी उपस्थित होते.