फ्लेमिंगोंच्या आगमनामुळे नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य गजबजले !

निफाड (दीपक श्रीवास्तव): पक्षी प्रेमींच्या नजरेतून महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या जागतिक कीर्तीच्या नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात फ्लेमिंगो या राजेशाही पक्षांच्या अनपेक्षितपणे झालेल्या आगमनामुळे पक्षी मित्रांमध्ये एकच उत्साह संचारला आहे.

नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात दि. २७ मे रोजी सकाळी अभयारण्यात भटकंंती करणारे गाईड व कर्मचारी यांना १०० ते १५० च्या समूहाने दाखल झालेल्या फ्लेमिंगोचे दर्शन झाले. सर्वसाधारणपणे फ्लेमिंगो हे पक्षी आपल्या परिसरामध्ये अतिशय तुरळक प्रमाणात जून महिन्याच्या अखेरीस हजेरी लावत असतात. यंदा मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून या परिसरात पावसाने मेहेर नजर केल्यामुळे वातावरण एकदम बदलून गेलेले आहे. जणू काही पावसाळाच एक महिना आधी सुरू झाल्या त्यामुळे फ्लेमिंगो देखील महिनाभर आधीच आणि ते देखील खूप मोठ्या संख्येने नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य मध्ये येऊन डेरेदाखल झालेले आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करीत हरित कुंभसाठी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी जलज शर्मा

फ्लेमिंगो या पक्षांना संस्कृत मध्ये अग्निपंख आणि रोहित अशी आकर्षक नावे आहेत. अग्निपंख म्हणजे या पक्षांच्या शरीरावर पंखांवर लाल गुलाबी रंगाची छटा असते. मूळचे पांढरे असलेले पक्षी त्यांच्या शरीरावर या आकर्षक गुलाबी रंगसंगतीमुळे खूपच सुंदर आणि आकर्षक असे दिसत असतात. सुमारे चार फूट उंचीचे हे पक्षी उथळ पाण्यामध्ये आपले अन्न शोधत असतात. उथळ पाण्यामध्ये वाढणारे विशिष्ट प्रकारचे शेवाळे हे त्यांचे आवडते खाद्य असते.

लांबलचक मान, एक विशिष्ट वाक असलेली चोच आणि एकाच वेळी थव्याने उडण्याची त्यांची पद्धत तसेच आपल्या जोडीदाराशी हळुवार रोमँटिकपणे प्रेम करण्याची त्यांची सवय या सर्व गोष्टींमुळे फ्लेमिंगो हे खऱ्या अर्थाने सर्व पक्षांमध्ये आगळे वेगळे असे उठून दिसतात.

कच्छ-सौराष्ट्र या भागात त्यांचा अधिवास खूप मोठ्या प्रमाणात आढळतो, पाणथळ ठिकाणी वाळूचे ढिगारे करून त्यावर आपली घरटी बांधणारे फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खूप मोठ्या संख्येने झेपावत असतात.

👉 हे ही वाचा:  नाशिक: ३० लाखांच्या कपड्याच्या मालाचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना अटक !

यंदा लवकर दाखल झालेल्या मान्सून बरोबरच फ्लेमिंगो च्या रुबाबदार आगमना मुळे नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात विहंगम दृश्य पहावयास मिळत आहे. मध्यंतरी वन विभागाने नांदूर मध्यमेश्वर जलाशयातील पान वनस्पती निर्मूलनाचे काम केल्यामुळे अभयारण्यातील पक्षी आणि वन्यजीवांना मोकळा श्वास घेता येऊ लागला आहे. फ्लेमिंगो ला उपयुक्त शेवाळ खाद्य म्हणुन उपलब्ध झाल्याने परतीच्या प्रवासात देखील फ्लेमिंगी चा थवा अभयारण्यात मुक्काम ठोकुन आहे. अभयारण्यातील स्टोर्क जेट्टी परिसरात हा थवा तळ ठोकून आहे.

“फ्लेमिंगोंसाठी आवश्यक असलेल्या पाणथळ जागा, शैवालयुक्त अन्न, आणि शांत परिसर नांदूर मध्यमेश्वरात उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांचा वावर इथे दरवर्षी वाढतोय. पर्यावरणीय संतुलनासाठी हे अत्यंत सकारात्मक संकेत आहेत. – हेमंत उबाळे (सहायक वन संरक्षक, वन्यजीव)

👉 हे ही वाचा:  मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ

“नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपल्या जिल्ह्यासाठी मोठा ठेवा आहे, या ठिकाणी देश परदेशातून पर्यटक पक्षी निरीक्षणासाठी येत असतात. नेहमी हिवाळ्यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे हा परिसर गजबजून गेलेला असतो, मात्र यंदा पावसाळ्यात देखील फ्लेमिंगो बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. पर्यटकांनी पक्ष्यांच्या नैसर्गिक वावरात व्यत्यय न आणता शांतता राखावी आणि परिसर स्वच्छ ठेवून सहकार्य करावे.”– संदीप काळे (प्रभारी वनपाल)

“या पक्षी अभयारण्यामध्ये मोठ्या संख्येने स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी सातत्याने येत असतात प्रत्येक पक्षाचे वैशिष्ट्य वेगवेगळे असले तरी यावर्षी आलेले फ्लेमिंगो पक्षी हे खऱ्या अर्थाने नांदूर मध्यमेश्वरचे वैभव वाढवत आहेत यात शंका नाही.” – गंगाधर आघाव, स्थानिक पक्षी मार्गदर्शक

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790