देशातल्या किनारपट्टीच्या राज्यांवर आता एका नव्या चक्रीवादळाचा धोका घोंघावत आहे. या नव्या चक्रीवादळाचं नाव आहे बिपरजॉय. देशातल्या तीन राज्यांना या वादळाचा धोका आहे. हे चक्रीवादळ किनाऱ्यापासून १००० -११०० किलोमीटर लांब असल्याने त्याचा प्रभाव आत्ता कमी असल्याचंही सांगितलं जात आहे.
हवामान विभागाने या चक्रीवादळाबद्दल अलर्ट जाही केला आहे. तसंच मच्छिमारांना खोल समुद्रात मासे पकडायला न जाण्याचा सल्लाही दिला आहे. वादळाबाबत अंदाज आहे की वाऱ्याचा वेग वाढणं ही चिंतेची बाब ठरू शकते. मुंबई हवामान विभागाचे तज्ज्ञ सुनील कांबळी यांनी सांगितलं की, मान्सून केरळमध्ये पोहोचताच मुंबईत मान्सून सुरू झाल्याची माहिती दिली जाईल.
भारतीय हवामान विभाग (IMD) ने मंगळवारी सांगितलं की, गुजरातमधील पोरबंदरच्या दक्षिणेकडील आग्नेय अरबी समुद्रावरील दबाव वायव्येकडे सरकण्याची आणि चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाचं नाव बिपरजॉय असं असेल. हे नाव बांगलादेशने दिलेलं आहे. हे वादळ पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर जवळजवळ उत्तरेकडे जाण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्यानं सांगितलं की, चक्रीवादळाचं गुरुवारी सकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतर होईल आणि शुक्रवारी संध्याकाळपर्यंत अति तीव्र चक्री वादळात रुपांतर होईल. त्याचा परिणाम गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये दिसून येत आहे.
केरळ-कर्नाटक आणि लक्षद्वीप-मालदीव भागात ६ जून रोजी आणि कोकण-गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर ८ जून ते १० जून या कालावधीत समुद्राची स्थिती अत्यंत खराब राहण्याची शक्यता आहे. समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आयएमडीने सोमवारी सांगितलं की, आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आणि त्याची तीव्रता केरळ किनारपट्टीच्या दिशेनं मान्सूनच्या प्रगतीवर गंभीर परिणाम होण्याची अपेक्षा आहे.