नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): अलिकडच्या काळात संपर्क क्रमांक शोधण्यासाठी गुगलचा वापर केला जातो. परंतु त्यावरील क्रमांक हे खरेच असतात असे नव्हे. त्यामुळे एका अभियंत्याला गुगलवरून मिळालेल्या बँके संपर्क क्रमांकावर फोन करणे चांगलेच महागात पडले असून, संशयित सायबर भामट्याने अभियंत्याला सहा लाखांचा गंडा घातला आहे.
लखदीप सिंग (५५, रा. जुना सायखेडा रोड, दसक, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते सिन्नर येथील नामांकित कंपनीत अभियंता आहेत. त्यांचे आयडीबीआय बँकेत अकाऊंट आहे. २१ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांना त्यांच्या बँक खात्याच्या इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड रिसेट करावयाचा होता. त्यासाठी त्यांनी आयडीबीआय बँकेशी संपर्क साधण्यासाठी गुगल या संकेतस्थळावर बँकेचा मोबाईल क्रमांक शोधला.
त्यांना त्यावर मिळालेल्या ६२९१९५९२६३ या मोबाईल क्रमांकावर सिंग यांनी संपर्क साधला. त्यावेळी संशयित सायबर भामट्याने बँकेचाच कर्मचारी असल्याचे सांगत त्यांना इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड रिसेट करण्यासाठीची प्रक्रिया सांगितले आणि सिंग यांना आलेला ओटीपी क्रमांक विचारून घेतला.
त्यानंतर संशयिताने सिंग यांच्या खात्याचा ताबा घेत, इंटरनेट बॅकिंगच्या माध्यमातून सिंग यांचया खात्यावर असलेले ६ लाख रुपये काढून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.