मुंबई | ९ जून २०२५: ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान दोन लोकल ट्रेनच्या दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये झालेल्या धडकेत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या अपघातात एकूण आठ जण ट्रॅकवर पडले.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अप आणि डाऊन मार्गावरून विरुद्ध दिशांनी जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांची पाठीला लावलेल्या बॅगेमुळे जोरदार धडक झाली. या धडकेत अनेक प्रवासी ट्रेनमधून खाली फेकले गेले. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच नव्या लोकल गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर प्रणाली बसवली जाणार असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. जेणेकरून दरवाजे प्रवासादरम्यान आपोआप बंद होतील आणि अशा दुर्घटना टाळता येतील.
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करणे हा मोठा धोका असून, जागा असूनही अशा प्रकारची सवय अनेक प्रवाशांमध्ये दिसून येते. प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केलं आहे की, ट्रॅक ओलांडू नये, दरवाजात उभं राहू नये आणि आपल्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहावं.
याशिवाय, गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अनेक कार्यालयांना वेळांमध्ये बदल करण्याची विनंती केली होती. सुमारे पाच हजार कार्यालयांमध्ये हे आवाहन करण्यात आलं होतं, मात्र केवळ ४० ठिकाणांहूनच सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वे प्रशासनाने याआधी अनेकदा जनजागृती मोहीम राबवून देखील अशा घटनांमध्ये सातत्य राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रत्यक्ष यंत्रणेत बदल करून सुरक्षेची नवी व्याख्या उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.