नाशिक (प्रतिनिधी): गेल्या मार्च महिन्यात जुन्या वादातून सराईत गुन्हेगारांनी एका चारचाकीचा पाठलाग करून त्यातील दोघांवर भरदिवसा गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. कार्बन नाका परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणात संशयितांविरोधात मोक्काअन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.
परंतु गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने शिंदेगावात सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
अक्षय उत्तम भारती (२४, रा. नक्षत्र बिल्डिंग, शिवाजीनगर, कार्बन नाक्याजवळ, सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गेल्या १९ मार्च रोजी भरदिवसा कार्बन नाका परिसरात संशयितांनी स्कोडा कारला पाठीमागून धडक दिली आणि दोघांवर गोळीबार केला होता.

याप्रकरणी सातपूर पोलिसात प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु संशयित अक्षय भारती हा तेव्हापासून फरार होता. शहर गुन्हेशाखा त्याचा शोध घेत असतानाच तो शिंदे गावात आला असल्याची खबर गुंडाविरोधी पथकाला मिळाली.
त्यानुसार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकाने सापळा रचून बुधवारी (ता. २१) रात्री शिंदे गावातून शिताफीने जेरबंद केले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, एक दुचाकी (एमएच १५ डीएन ३६५७) असा १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासकामी त्यास सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी, गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, डी.के. पवार, प्रदीप ठाकरे, नितीन जगताप, गणेश भागवत, गणेश नागरे, सुनील आडके, राजेश सावकार, अक्षय गांगुर्डे, संदीप आंबरे यांच्या पथकाने बजावली.
नक्की काय होती घटना ?:
राहुल पवार याच्या फिर्यादीनुसार, संशयित आशिष राजेंद्र जाधव, चेतन अशोक इंगळे, अक्षय उत्तम भारती, गणेश राजेंद्र जाधव, सोमनाथ झंजार आणि किरण चव्हाण यांनी फिर्यादी व त्याचा साथीदार तपन जाधव यांच्यावर कार्बननाका परिसरात पूर्ववैमनस्यातून गोळीबार केला होता.
फिर्यादी राहुल यानेही यापूर्वी संशयितांपैकी एकाच्या भावाचा खून केला आहे. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून काटा काढण्यासाठी हा गोळीबार झाल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. याप्रकरणी संशयितांविरोधात मोक्काअन्वये कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु अक्षय भारती तेव्हापासून फरार होता.
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790