नाशिक (प्रतिनिधी): घुसखोरी करत बांग्लादेशातून भारतात दाखल होत थेट पाथर्डी गावात स्थानिकाच्या मदतीने भाडेतत्त्वावर राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिला व एका पुरुषाला नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने रविवारी (दि. १८) अटक केली. तसेच बांग्लादेशी युवतीसोबत लग्न करून त्यांना आश्रय देणाऱ्या स्थानिकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
शागोर मोहंमद अब्दुल हुसेन मलिक माणिक (२८), मुस्मम्मत शापला खातून (२६), इतिखानम मोहंमद लाएक शेख (२७, सर्व रा. हल्ली काजी मंजील, पाथर्डी, मूळ बांग्लादेश) अशी तिघांची नावे आहेत. संशयित गोरक्षनाथ विष्णू जाधव (३२, मूळ रा. वरवंडी ता. दिंडोरी) याला अटक अटक करण्यात आली आहे.
दहशतवादविरोधी पथकाने रविवारी (दि. १८) पथकाने इंदिरानगर पोलिस ठाणे गाठत निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मदतीने पाथर्डी गावातील काजी मंजिल या घरावर पंचांसमक्ष छापा टाकला.
पोलिसांनी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीचा दरवाजा वाजविला तेव्हा एकाने दरवाजा उघडला. यावेळी पथकाने चौकशी सुरू केली. त्याने भाडेतत्त्वावर घर घेतले असल्याचे सांगून सोबत असलेल्या व्यक्तींची नावे व नाते सांगितले. बेरोजगारीला कंटाळून मूळ वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय व दूतावासाची (अॅम्बेसी) परवानगी न घेता घुसखोरी करत भारतात प्रवेश केल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे. जाधव याने इतिखानम मोहंमद लाएक शेख हिच्यासोबत लग्न केले असून त्यांना एक चार वर्षांची मुलगीसुद्धा असल्याचे समोर आले आहे. या चौघांविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांगलादेशातील एजंटला पैसे देऊन त्यांनी भारतात घुसखोरी केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबत एटीएस, नाशिकच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता जाधव यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून वास्तव्य केल्याने, पारपत्र अधिनियमाच्या कलमांसह परकीय नागरिक आदेश, परकीय नागरिक कायद्यांतर्गत आणि भारतीय न्याय संहिता कलम ३ (६) अन्वये रात्री उशिरा इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास इंदिरानगर पोलिसांकडून केला जात आहे.