नाशिक (प्रतिनिधी): येणारा पावसाळा लक्षात सोशल डिस्टन्सिंग पाळत खुले लॉन्स, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह येथे 50 लोकांच्या मर्यादेत लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एका शासकीय पत्रकान्वये दिली आहे.
कोरोना साथीमुळे यंदा ऐन लग्नसराईत एप्रिल, मे आणि जून महिन्यात मंगल कार्यालय, लॉन्स बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेक विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले. तर काही विवाह सोहळे हे घरात अगदी साधेपणाने अवघ्या 30 ते 50 वऱ्हाडीच्या उपस्थितीत पार पडले. मात्र आता ज्या मंगल कार्यालयात, हॉलमध्ये वातानुकूलितची सुविधा (एसी) नसेल अश्यांना लग्न समारंभाची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी लग्न सोहळ्यासाठीची पाहुणे मंडळींची उपस्थिती ही वाढविण्यात आलेली नाही. केवळ 50 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.
याशिवाय घरात किंवा घराच्या परिसरात लग्न समारंभ आयोजित करण्याची परवानगी कायम राहिल. या आदेशामुळे घरी लग्न असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मंगल कार्यालय , लॉन्स येथे लग्न समारंभ करण्यास मनाई करण्यात आली होती, परंतु आता या आदेशामुळे अशा समारंभासाठी परवानगीची मागणी केल्यास ती संबंधित सक्षम अधिकाऱ्यांकडून देण्यात येणार असल्याने लग्नसमारंभासाठी निर्माण झालेली जागेची अडचण दूर झालेली आहे असेही मांढरे यांनी सांगितले.