नाशिक: लॉजिस्टीक पार्कसाठी शहरात या ठिकाणी १०० एकर जागेचे भूसंपादन !
नाशिक (प्रतिनिधी): पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त शहराची ओळख कायम राखण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास व नौकावहन मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशांनुसार प्रस्तावित सुरत-चेन्नई महामार्गालगत आडगाव शिवारात लॉजिस्टीक पार्क उभारण्यासाठी १०० एकर जागेचे भूसंपादन करण्याच्या स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या प्रस्तावाला महासभेने शुक्रवारी मंजुरी दिली.
या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे निर्देश महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिले.
के.के.वाघ ते हॉटेल जत्रा दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या लोकार्पण सोहळ्यात गडकरी यांनी नाशिक शहरातील राहण्यायोग्य वातावरण, तुलनेत कमी असलेले प्रदूषण, सुटसुटीत वाहतुकीविषयी कौतुक करताना भविष्यात पुण्यासारखी नाशिकची परिस्थिती होवू नये यासाठी आतापासूनच काळजी घेण्याच्या सूचना महापालिकेतील पदाधिकारी आणि आयुक्तांना केल्या होत्या.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9040,9046,9029″]
नाशिकला प्रदूषणापासून वाचवायचे असेल तर आतापासूनच प्रदूषणकारी घटकांना शहरापासून दूर ठेवले पाहिजे, असे नमूद करताना अवजड वाहने, कंन्टेनर शहरात येऊ न देता शहराबाहेर एखादा लॉजिस्टीक पार्क उभारून त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्याचे सूचित केले होते. मीरा भाईंदर, बदलापुर व भिवंडी येथे तीन हजार कोटी खर्चून तीन लॉजीस्टीक पार्क मंजुर केले आहे. नाशिकमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार व खासदार हेमंत गोडसे यांनी पुढाकार घेतल्यास असे लॉजिस्टीक हब उभारता येईल, असे सूचित करताना सुरत-चेन्नई मार्गालगत स्मार्ट सीटीही करता येईल, त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रणा, पालिकेने चाचपणी करावी असेही आवाहन गडकरी यांनी केले होते.