वीज ग्राहकांना खरोखर जास्त बिले आली आहेत का ? वीज वितरणने केला हा खुलासा..

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रार्दुर्भाव असतांना देखील महावितरणने ग्राहकांना अखंडित व नियमित वीज पुवठा करून ग्राहकांना घरात राहणे सुसह्य केले. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा  खंडित केला नाही. राज्यातील ४१ लाख ७हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२हजार ग्राहकांनी एप्रिल २०ते जानेवारी २१सलग  या दहा महिन्यांच्या काळात एकही वीज बिल भरले नाही, यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १लाख ३१ हजार ग्राहकांचा समावेश असून त्यांचेकडे १०३ कोटी रुपये थकबाकी आहे.

त्यामुळे थकबाकीमध्ये करोडो रूपयांची भर पडली असून महावितरणला प्रचंड मोठया आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना २४X७ वीजपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीज खरेदी करावी लागत असून विजेच्या पारेषणवरही मोठा खर्च करावा लागत आहे. महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून ग्राहकांनी  आपल्या वीजबिलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २३ मार्च २० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांकडे जाऊन वीजमीटरचे रिंडिग घेणे तात्पुरते बंद करण्यात आले. लॉकडाऊन सुरु असताना मार्च ते साधारणतः जून महिन्यापर्यंत भर उन्हाळ्यात नागरिकांना घरात राहणे सुसह्य व्हावे, यासाठी वीजपुरवठा सुरळीत व अखंडित ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. कोरोनाच्या कालावधीत अखंडित वीजपुरवठ्यासाठी कर्तव्य बजावताना संसर्गामुळे अनेकांना प्राण गमावावे लागले. विशेष म्हणजे या १० महिन्याच्या कालावधीत थकबाकीच्या कारणावरून सर्वच वर्गवारीमधील एकाही वीजग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला नाही. वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमिवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. दरमहा वसुलीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. वीजग्राहकांना २४x७ वीजपुरवठा सुरु आहे.

मात्र दर महिन्यात होणाऱ्या वीजबिल वसुलीचे प्रमाण अतिशय कमी असल्याने दरमहा वीजखरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जांचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत आहे. परिणामी येत्या काही दिवसात या थकबाकीमुळे वीजपुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची व अडचणी येण्याची शक्यता आहे.

वीजबिलांच्या एकूण ९,८०,४९९  पैकी ९,३३,३२४ तक्रारीचे निवारण महावितरणने  केले आहे. उर्वरित तक्रारींचे निवारण करण्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आहे.  राज्यातील वीजबिलांच्या केवळ ४७ हजार तक्रारी वगळता उर्वरित सर्व तक्रारींचे महावितरणकडून निवारण करण्यात आले आहे. याशिवाय वीजग्राहकांच्या तक्रारी किंवा शंका निरसन करण्यासाठी राज्यभरात ३२०१ वेबिनार, ५६७९ मेळावे घेण्यात आले होते. तसेच १५५२४ मदत कक्ष सुरु करण्यात आले होते. त्यापैकी १७४२ मदत कक्ष अद्यापही सुरु आहे.लॉकडाऊनमुळे मार्चनंतर प्रथमच वापरलेल्या विजेचे प्रत्यक्ष रिडींग जून महिन्यात घेण्यात आले आहे.

त्यामुळे जूनच्या वीजबिलात लॉकडाऊनच्या कालावधीमधील (सुमारे ९० ते ९७दिवस) वीजवापरानुसार युनिट संख्या नोंदविण्यात आली आहे. या युनिट संख्येला सुमारे तीन महिन्यांत विभागून योग्य स्लॅब दरानुसार वीजबिलाची आकारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड लादलेला नाही अशी ग्वाही देत वीजग्राहकांनी विश्वास ठेवावा. याबाबतचा संपूर्ण हिशेब प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे.जूनमध्ये मीटर रिडींगनुसार देण्यात येणारी वीजबिले अचूकच आहे. केवळ मीटर रिडरकडून अनावधानाने रिडींग घेण्यात काही चूक झाली असल्यासच वीजबिल चुकीचे असू शकते. मात्र महावितरणकडून रिडींगप्रमाणे देण्यात येणारी वीजबिल चुकीचे आहे हा गैरसमज ग्राहकांनी करून घेऊ नये असा स्पष्ट निर्वाळा वीजक्षेत्रातील तज्ञांनी देखील दिला आहे.

वीजग्राहकांनी रिडींगप्रमाणे दिलेल्या वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये. एप्रिल, मेमधील लॉकडाऊनचा कालावधी, प्रखर उन्हाळा व सर्वच जण घरी असल्याने वाढलेला वीजवापर आदींमुळे युनिटची संख्या वाढलेली आहे. मात्र २०१९ मधील एप्रिल ते जूनच्या कालावधीतील वीजवापराचा विचार केल्यास यंदाच्या एप्रिल ते जूनपर्यंत तेवढाच वीजवापर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भूर्दंड लादण्यात आलेला नाही किंवा फसवणूक करण्यात आलेली नाही. केवळ लॉकडाऊनमुळे एप्रिल व मेमध्ये सरासरी वीजबिले द्यावी लागल्याने ती मीटर रिडींगप्रमाणे अचूक दुरुस्त करून जूनमध्ये एकूण तीन महिन्यांचे वीजबिल देण्यात आले आहे. तसेच सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास ती जून महिन्यातून वजा करण्यात आली आहे.

महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली असून आर्थिक अडचणीत असलेल्या थकबाकीदार वीजग्राहकांनी दिलासा देण्यात आला आहे. सोबतच खंडित वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्याची संधी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये वीजपुरवठा सुरु असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीजग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. उच्चदाब वीजग्राहकांना मंडल कार्यालय, २० किलोवॅटपेक्षा अधिक वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना विभागीय कार्यालय आणि २० किलोवॅटपर्यंत वीजभार असलेल्या लघुदाब ग्राहकांना उपविभाग कार्यालयांमध्ये अर्ज करून या योजनेत सहभागी होता येईल.

वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमिवर विजेची मागणी व पुरवठा यामध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. विजेचे दर हे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाद्वारे निश्चित करण्यात येत असतात. वाढीव वीज बिल आल्याच्या तक्रारींची शहानिशा करण्याचे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.वीज ग्राहक हे महावितरणचे दैवत असून असून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यास कटीबद्ध आहे. हेल्प डेस्कद्वारे वीज बिलांसंबंधी तक्रारींचे निवारण करण्यात येत असून याबद्दल ग्राहकांनी समाधानही व्यक्त केलेले आहे. तेंव्हा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता ग्राहकांनी आपले वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790