नाशिक। दि. २७ जानेवारी २०२६: शासनमान्य ग्रंथ यादी निवडीकरिता सन 2025 या कॅलेंडर वर्षात ( 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025) प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथांची निवड करण्यासाठी आणि शासनमान्य ग्रंथाच्या यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत विनामूल्य (Complimentary Copy) ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पाठवावी, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ग्रंथभेट योजनेंतर्गत सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करून राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येतात.
28 फेब्रुवारी 2026 नंतर प्राप्त झालेल्या ग्रंथाचा ग्रंथ निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही. प्रकाशकाने सन 2025 या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविली असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. मुद्रण व नोंदणी अधिनियम 1867 अन्वये मुद्रकाने व ग्रंथ प्रदान अधिनियम, 1954 अन्वये प्रकाशकाने सदर ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, नगर भवन, मुंबई, शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे व शासकीय विभागीय ग्रंथालय, नागपूर येथे पाठविणे आवश्यक आहे. सदर ग्रंथ पोहोचल्याची पोच पावती संबंधित ग्रंथालयाकडून घ्यावी. ग्रंथालय संचालनालयास संबंधित ग्रंथ पाठविताना वरीलप्रमाणे ग्रंथ पाठविल्याची पोच पावती ग्रंथासोबत टपालामार्फत वा समक्ष पाठविण्यात यावी, असेही श्री. गाडेकर यांनी कळविले आहे.
![]()


