नाशिकला आज पोलिस कवायत मैदानावर ड्रोन शोचे आयोजन
नाशिक। दि. २६ जानेवारी २०२६: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2026 रोजी पोलीस परेड मैदान नाशिक येथे मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता होणार आहे.
यानंतर प्रागंणात कवायत संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम यासह भारतीय सेनेच्या आर्टिलरी स्कूल देवळाली यांच्या वतीने आर्टिलरी रेजिमेंटच्या विविध शस्त्रसामग्रीचे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या उपकरणांचे प्रदर्शन व ड्रोन शोचे आयेाजन केले आहे. नागारिकांनी हे आगळेवेगळे प्रदर्शन पाहण्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
नाशिक शहरात भारतीय सेनेमार्फत प्रथमच अशा अत्याधुनिक शस्त्रसामग्रीचे प्रदर्शन होत असून नागरिकांना या प्रदर्शनातून नागरिकांना भारतीय सेनेच्या तंत्रज्ञानाची व सज्जतेची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. या शस्त्रसामग्री प्रदर्शनामध्ये भारतीय सेनेच्या आर्टिलरी रेजिमेंटच्या साहाय्याने वापरण्यात येणाऱ्या विविध तोफ प्रणाली व लाँचर्सचा समावेश असणार आहे. या तोफा विविध कॅलिबरच्या असून त्यामध्ये हलक्या मॉर्टारपासून फिड गन्स तसेच मोठया कॅलिबरच्या मिडियम गन्सचा समावेश आहे. ते अत्याधुनिक रॉकेट लाँचरपर्यंतच्या साधनांचा समावेश आहे. तसेच प्रत्येक शस्त्रसामग्रीची सविस्तर माहिती येथे देण्यात येणार आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ड्रोनचा व्यापक वापर झाल्याचे दिसून आले. शत्रूच्या लक्ष्यांवर प्रभावी हल्ले करण्यासाठी ड्रोनचा यशस्वी वापर कसा करण्यात आला, याची माहिती या प्रदर्शनातून दिली जाणार आहे. टेहळणी, निरीक्षण व लक्ष्य निश्चिती यासाठी ड्रोन हे भारतीय सेनेचे अत्यंत महत्त्वाचे साधन ठरत असून, प्रजासत्ताक दिनी आठ दक्षता ड्रोन समन्वयित हालचालीचे सादरीकरण नागरिकांना पाहता येणार आहे.
याचवेळी एफपीव्ही (FPV) ड्रोनचे विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार असून, हे ड्रोन ताशी सुमारे २५० किलोमीटर वेगाने उडण्यास सक्षम असून आत्मघाती हल्ल्यांसाठी वापरण्यात येतात.
प्रदर्शनात राष्ट्रीय आपत्ती दल आपत्ती काळात बचाव कार्यायाठी वापरण्यात येणारी उपकरणे, मानवनिर्मित आपत्तीवेळी सुरक्षित राहणाऱ्यासाठी माहिती नागरिकांना देणार आहेत. तसेच एनडीआरएफचे अनुभवी जवान यावेळी या उपकरणांचे प्रात्यक्षिक (Mock Drill) सादर करून आपत्ती काळात बचाव कार्य कशाप्रकारे केले जाते हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे.
सदा प्रदर्शन मोफत असून कवायत संचलनानंतर नागरिकांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत देवळाली आर्टिलरी स्कूलच्या विविध शस्त्रसामग्रीचे हे प्रदर्शन पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. असेही असल्याचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी कळविले आहे.
![]()


