
नाशिक। दि. २५ जानेवारी २०२६: गुन्हेशाखा युनिट क्रमांक ०२ च्या पथकाने चोरीच्या मोटारसायकल विक्रीसाठी आलेल्या इसमाला दिंडोरी रोड परिसरातून अटक करत २ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या पाच मोटारसायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे शहरातील विविध पोलीस ठाण्यांतील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
गुन्हेशाखा युनिट ०२चे अधिकारी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण व सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचत आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोर, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलजवळील टेकडी परिसरात कारवाई केली.
या कारवाईत श्रावण संपत मोरे (वय ४५, रा. फ्लॅट नं. ३, आशादीप अपार्टमेंट, पोकार गल्ली, गणेश कॉलनी, म्हसरूळ, नाशिक) याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. अधिक चौकशीत त्याच्याकडून एकूण पाच चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे २,७०,००० रुपये आहे.
या कारवाईमुळे सरकारवाडा पोलीस ठाणे येथे दाखल असलेले दोन, गंगापूर पोलीस ठाणे येथील दोन तसेच अंबड पोलीस ठाणे येथे दाखल असलेला एक, असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीस पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमालासह सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
![]()


