भारतीय सैन्य दलातर्फे दिवसभर प्रदर्शन; नागरिकांना उपस्थितीचे आवाहन
नाशिक। दि. २५ जानेवारी २०२६: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.५० वाजेपासून पोलीस कवायत मैदान, नाशिक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने भारतीय सैन्य दलातर्फे दिवसभर लष्करी उपकरणांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी केले आहे.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कवायतीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), महाराष्ट्र पोलीस अकादमीचे पोलीस उपनिरीक्षक, वनरक्षक, नागरी संरक्षण दल तसेच भोसला मिलिटरी स्कूलचे अश्वदल पथक सहभागी होणार आहे. यातील काही पथके प्रथमच या कवायतीत सहभागी होणार असून या सोहळ्याचे ते आकर्षण ठरणार आहेत.
तसेच समारंभात पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि भारतीय सेनेच्या आर्टिलरी स्कूल यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन व संरक्षण विषयक अत्याधुनिक उपकरणांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय सेनेच्या आर्टिलरी स्कूलकडून ड्रोन युद्धतंत्राचे प्रात्यक्षिक, तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस दलाच्या कमांडो पथकाकडून दहशतवादविरोधी कारवाईचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान तीन सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. तसेच अलीकडील मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान आपत्ती निवारणासाठी संकलित निधीतून सशस्त्र सेना ध्वजदिन निधी (Armed Forces Flag Day Fund) अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे सैनिक कल्याण कार्यालयास धनादेश प्रदान करण्यात येणार आहे.
हा सर्व सोहळा नागरिकांसाठी खुला असून, प्रदर्शनात भारतीय सेनेची विविध लष्करी शस्त्रसामग्री, तोफा, रॉकेट प्रणाली, रडार यंत्रणा, ड्रोन तसेच इतर आधुनिक उपकरणे नागरिकांच्या पाहणीसाठी दिवसभर उपलब्ध राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या भव्य शासकीय समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी श्री. प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी पोलिस कवायत मैदानावर जाऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची पाहणी करीत तयारीचा आढावा घेतला.
![]()


