
नाशिक। दि. २६ जुलै २०२५: सिडको परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट क्रमांक १, नाशिक शहर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा एकूण ३०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि विशाल काठे यांनी संबंधित माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दत्त चौक, सिडको येथे सापळा रचून आरोपीला शिताफीने अटक केली.
अटक केलेल्या व्यक्तीचे नाव अविनाश राऊसाहेब वाणी (वय ३०, रा. रविवारी पेठ, चांदीच्या गणपतीच्या मागे, रविवार कारंजा, नाशिक) असे आहे. आरोपीच्या ताब्यातून ३०,००० रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि ५०० रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. सदर व्यक्तीवर गंगापूर, सरकारवाडा आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस हवालदार प्रशांत मरकड, विशाल काठे, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, नाजीमखान पठाण, अमोल कोष्टी आणि चालक सुकाम पवार यांनी संयुक्तपणे केली.
या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली दहशत कमी होण्यास मदत झाली असून, आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.