ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांचे विकासकांना निर्देश
नाशिक। दि. २५ जुलै २०२५: महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0’ या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील कृषी वाहिन्या सौर ऊर्जित करुन शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर प्रकल्प विकासकांना कार्यादेश देण्यात आलेले आहेत. शेतकरी आणि राज्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षा असलेल्या या प्रकल्पाची कामे विहित कालावधीत व मुदतीत पूर्ण न करणाऱ्या विकासकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच प्रकल्प पूर्ण करताना विकासकांच्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधितांना संपूर्ण जिल्हा प्रशासन सहकार्य करणार असून त्यामूळे प्रचंड गतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्र ऊर्जा विभागाच्या अप्पर सचिव आभा शुक्ला यांनी दिले.

सौर कृषी वाहिनी योजनेला गतिमान करण्यासाठी त्यांनी शुक्रवारी (दि.२६जुलै) रोजी नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात महावितरण, सौर संबंधित सौर प्रकल्प विकासक आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांची एकत्रित आढावा बैठक घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
बैठकीला अप्पर प्रधान सचिव आभा शुक्ला यांचेसह महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे , निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत मंचावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून योजनेअंतर्गत राज्यात १६ हजार मेगावॉट सौर ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे भव्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार असून, त्यांना दिवसा भरवशाची वीज मिळेल आणि सिंचनाला मदत होणार आहे.
यावेळी बैठकीला संबोधित करताना अतिरिक्त मुख्य सचिव म्हणाल्या की, शासनाने ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ योजनेअंतर्गत प्रकल्प उभारणाऱ्या विकासकांनी कार्याची प्रगती ऑनलाईन पोर्टल वर अद्यावत करावी. जे सौर प्रकल्प विकासक या सामाजिक दायित्वाच्या प्रकल्पामध्ये गंभीरतेने काम करणार नाहीत, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंते यांनी सुद्धा या योजनेच्या दैनंदिन कामावर समन्वयक अधिकारी म्हणून लक्ष केंद्रित करून देखरेख ठेवण्याचे निर्देश आभा शुक्ला यांनी दिले.
‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ योजना गतिमान करण्यासाठी नाशिक जिल्हयात १८६ विद्युत उपकेंद्र या योजनेतून सौर उर्जिकरण होणार असून १ हजार ३४३ मेगावॉट वीज निर्मित होणार आहे.यासाठी दोन टप्प्यात विविध सौर प्रकल्पाचे सौर विकासकांना कार्यादेश देण्यात आलेले आहेत. यामुळे जिल्हातील शेतकऱ्यांना दिवसा आणि अखंडित वीज मिळणार असून यासाठी जिल्ह्यातील प्रशासनाच्या सर्वच घटकांची मदत राहणार असून सर्व यंत्रणानी सहकार्य करावे असे आवाहन केले.
या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सौर प्रकल्प विकासकांचे प्रतिनिधी यांनी प्रकल्प पूर्ण करताना काही व्यक्ती जाणीवपूर्वक काही ठिकाणी प्रकल्पाच्या जागेत अतिक्रमण केलेले असून काही ठिकाणी अडथळा निर्माण करीत असल्याची माहिती यावेळी बैठकीत दिली. यावेळी बैठकीला उपस्थित असलेले निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत यांनी यांनी या प्रकल्पातील जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण तत्काळ काढण्यासोबतच अडचणी दूर केल्या जातील. सामाजिक दायित्वाच्या या प्रकल्पात प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी उपस्थिताना दिले. बैठकीनंतर त्र्यंबकेश्वर उपविभागातील कोने येथील प्रस्तावित सौर प्रकल्पातील जागेची अप्पर प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.
बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश थूल, देवेंद्र सायनेकर, महावितरणचे सर्व कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते,सौर प्रकल्प विकासक यांचेसह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.