मुंबई , दि. २१ जुलै २०२५ (जिल्हा माहिती कार्यालय): राज्यातील एकही गरीब, गरजू रुग्ण उपचारांच्या सुविधेपासून वंचित राहू नये, अशा रुग्णांवर वेळेत दर्जेदार उपचार व्हावेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेत निधी उपलब्ध होऊन उपचार मिळावेत म्हणून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर हा कक्ष कार्यान्वित आहे.
नाशिक जिल्ह्यात जानेवारी २०२५ पासून ते आतापर्यंत एक हजार ४८ रुग्णांना ९ कोटी ६९ लाख २४ हजार रुपयांची मदत झाली आहे. तसेच या कक्षामार्फत १ मे २०२५ ते आतापर्यंत ७५ रुग्णांना ६१ लाख ६० हजार रुपयांची मदत झाली आहे.
गरजू रुग्ण आर्थिक परिस्थितीअभावी वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहू नये म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत वैद्यकीय कागदपत्रांची पडताळणी करून निधी रुग्णाच्या उपचाराकरीता इस्पितळाला उपलब्ध करून दिला जातो. नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात २८ फेब्रुवारी २०२५ पासून हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याचे औपचारिक उदघाटन महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे २०२५ रोजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी जलज शर्मा, कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. चैतन्य देवीदास बैरागी हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना (मोफत उपचार), धर्मादाय रुग्णालय (मोफत/सवलतीच्या दरात), राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम (मोफत उपचार) या तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीतर्फे तपासणी करून अर्थसाहाय्य करण्यात येते.
👉 या योजनेच्या पात्रतेचे निकष असे : विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयाचे निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे (खासगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक प्रमाणित करणे आवश्यक आहे), तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त झालेला चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा १ लाख ६० हजार पेक्षा कमी), रुग्णाचे आधारकार्ड, रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे), बाल रुग्णांसाठी आईचे आधारकार्ड जोडणे आवश्यक, रुग्णाशी संबंधित आजारांचा तपासणी अहवाल, रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयाचे प्रवेश कार्ड जोडणे आवश्यक आहे. तसेच रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयातील जिओ टॅग फोटो (GPS MAP CAMERA PHOTO) आवश्यक आहे. अपघातग्रस्त रुग्णांसाठी प्रथम माहिती अहवाल (FIR), जनरल डायरीतील नोंद आवश्यक राहील. अवयव प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेडटीसीसी (ZTCC, झोनल ट्रान्स्प्लान्ट को-ऑडिनेशन कमिटी), शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रुग्ण उपचार घेणाऱ्या रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत विहित नमुन्यातील अर्जात नमूद केलेले २० प्रकारचे गंभीर आजारांसाठीच निधी देय आहे. या निधीचा लाभ रुग्ण रुग्णालयात दाखल असेपर्यंतच देय आहे. उपचार पूर्ण करून घरी सोडलेल्या रुग्णास खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून अर्थसाहाय्य देण्यात येणार नाही. अर्थसाहाय्याची मागणी कक्षाद्वारे डिजिटल पद्धतीने अर्जासह सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात पाठवून त्याच्या मूळ प्रती जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात जमा केल्या जातात.
👉 या आजारांसाठी मिळते मदत : अत्यंस्थ कर्णरोपण शस्त्रक्रिया, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्थिमज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, केरो औषधोपचार- किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशूचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात, बालकांशी संबंधित शस्त्रक्रिया, मेंदू विकार, हृदयरोग, डायलिसिस, भाजलेला रुग्ण, विद्युत अपघात, विद्युत जळित रुग्ण. (भाजलेला रुग्ण, विद्युत अपघात व विद्युत जळित रुग्ण या साठी पोलिसांकडील कागदपत्रे आवश्यक)
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात रुग्णातर्फे कागदपत्रे सादर करणाऱ्या अर्जदाराने सर्व आवश्यक कागदपत्रे व विहित नमुन्यातील अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला सादर केल्यास संबंधितास सर्वतोपरी सहकार्य करून जिल्हास्तरावरील कार्यालयाच्या ई- मेल आयडीवरून मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, मुंबई यांच्या ई- मेल आयडीवर पाठविला जातो. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षांतर्गत आजारानुसार किमान ५० हजार ते जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य केले जाते. नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षाच्या माध्यमातून १ मे २०२५ ते १६ जुलै २०२५ या कालावधीत ७५ रुग्णांना ६१ लाख ६० हजार रुपयांचे अर्थसहाय करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात जखमी एका २० वर्षीय तरुणीच्या उजव्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी १ लाख रुपयांची मदत या कक्षातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीकरीता पूर्वी राज्यासह देशातील देणगीदारांमार्फत देणगी मिळत होती. एफसीआरएची मान्यता मिळाल्याने या कक्षास परदेशातील देणगीदारही देणगी देऊ शकतात. नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत कक्षात डॉ. बैरागी यांच्यासह समाजसेवा अधीक्षक प्रकाश मधुकर भोये, आरोग्य विस्तार अधिकारी विठ्ठल दगा पाटील हे रुग्ण सेवेसाठी सदैव तत्पर असतात.