नाशिक । दि. १३ जुलै २०२५: “आम्ही पोलिस आहोत. येथे गस्त सुरू आहे”, असे सांगून ३ लाख ७० हजारांचे दागिने लांबवले. गुरु गोविंदसिंग कॉलेज रोडवर हा प्रकार घडला. इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि कमल भदाणे (७०, रा. सराफनगर, राणेनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सकाळी ७.२५ वाजता ब्रम्हकुमारी ओम शांती शिबिरासाठी गुरु गोविंदसिंग कॉलेजरोडने पायी जात असताना दुचाकीरील दोघांनी आवाज दिला. हेल्मेटधारी व्यक्तीने आपण पोलिस असल्याचे सांगितले.
“येथे वृद्धांना लुटण्याचे प्रकार घडत आहे. तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही येथे गस्त करत आहे. तुम्ही अंगावर एवढे सोने का घालून फिरता, तुम्ही दागिने काढून ठेवा, असे सांगीतले.” भदाणेंनी २० ग्रॅमची सोन्याची चेन, १० ग्रॅमच्या दोन अंगठ्या, ५० ग्रॅमच्या सोन्याच्या २ बांगड्या काढल्या संशयिताने कागदात गुंडाळून पिशवीत ठेवा असे सांगितले. मदतीचा बहाणा करत हातचलाखीने दागिने काढून घेतले. दुचाकीने दोघे निघून गेले. भदाणे घरी आल्यानंतर त्यांनी दागिने पाहिले असता मिळाले नाही.
(इंदिरानगर पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: २२३/२०२५)