
नाशिक। दि. ९ जुलै २०२५: धुळ्याच्या आरोग्य खात्यात कंत्राटी पद्धतीने विविध पदांवर नोकरभरती करून देण्याचे आमिष दाखवून सुमारे ९० जणांची एकूण १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना २९ मे रोजी उघडकीस आली होती. या गुन्ह्यातील म्होरक्या फरार संशयित आरोपी वैभव विजय पोळ (४९, रा. अलिबाग) याच्या नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने श्रीवर्धनच्या एका समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्टमध्ये मुसक्या आवळल्या.
फिर्यादी कुणाल भदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित फरार वैभव पोळ याचा शोध नाशिक गुन्हे शाखेकडून घेतला जात होता; मात्र त्याचा पत्ता लागत नव्हता.
त्याने साक्री तालुक्यातील त्यांच्या ओळखीच्या ९० जणांची फसवणूक करत पैसे उकळून नोकरी दिली नाही असे फिर्यादीत म्हटले होते. गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना फरार पोळ याच्याविषयी गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव यांचे पथक तयार करून सोमवारी (दि.७) रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन गाठले. तेथील समुद्रकिनारी असलेल्या विविध हॉटेल्स, लॉज, होमस्टे, रिसॉर्टची झाडाझडती घेत पोळ हा एका रिसॉर्टमध्ये मौज करताना पथकाच्या हाती लागला.